अकलूज : पोषक वातावरण व अर्थिक व्यवहारातील सुरक्षिततेमुळे अल्पावधीत देशभरातील घोडेबाजारात लौकिक प्राप्त झालेला अकलूजचा घोडेबाजार घोडे शौकिनांनी गजबजला असून या घोडेबाजारात १ लाखांपासून ते २५ लाखांपर्यंत किमतीचे घोडे विक्रीस आले आहेत.
अकलूजचा घोडेबाजार तटबंदी बंदिस्त आवार झाडीमुळे उन, वाऱ्यापासून सुरक्षित, मुबलक पाणी, वीज व आरोग्य स्वच्छतेची व्यवस्थता, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता व सुरक्षिततेमुळे देशभराच्या घोडेबाजारात अग्रगण्य ठरलेला अकलूजचा घोडेबाजार विक्रेता व खरेदीदार यांच्या वर्दळीने बहरलेला आहे.
घोडेबाजारात दाखल झालेल्या ८१० घोड्यांपैकी ३२५ घोड्यांच्या खरेदी विक्रीतून ३ कोटी १० लाखांची उलाढाल झाली आहे.
लाखांचे अश्व
■ विजापूर (कर्नाटक राज्य) येथील घोडे व्यापारी रियाज उर्फ बबलू यांचा पंजाबी नुक्रा जातीच्या २७ महिन्यांचा सकब ऊर्फ बादल हा दोन दाती घोडा बाजारात दाखल झाला आहे. त्याची किमत २५ लाख असून, खरेदीदारांनी १५ लाखांना मागणी केली आहे.
■ वेळापूरच्या लहू जाधव यांचा ६ वर्षांचा हिरा या अबलक दोन दाती घोड्याची ५ लाख ५० हजारांची बोली लावली आहे.
सजावटीची थाटली दुकाने
या घोडेबाजारात मोरकी, चाबुक, लगाम, खोगीर, साजचे संपूर्ण सामान आदी घोडा सजावटीसह नाल इ. वस्तूंची व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहे. अश्वपालन शौकीन, घोडे व्यावसायिक यांची खरेदीसाठी घोडेबाजारात रेलचेल सुरु आहे.