Join us

Akluj Ghoda Bazar : अकलूज बाजार समितीच्या घोडेबाजारात तब्बल २ कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 11:23 AM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाडवा घोडे बाजारात राज्यासह परराज्यातून ७१० घोड्यांची आवक झाली असून १८० घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

अकलूज : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाडवा घोडे बाजारात राज्यासह परराज्यातून ७१० घोड्यांची आवक झाली असून १८० घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेबाजाराला २००९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या नियोजनाखाली सुरुवात झाली.

या बाजारात मारवाड, पंजाब, नुखरा, काटेवाडी आदी जातींचे जातिवंत अश्व राज्यासह उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार या राज्यातील व्यापारी दाखल होतात.

घोडे बाजाराचा आवार चहूबाजूने तटबंदी असून ७०० चिंचेच्या झाडांमुळे परिसरात सावली उपलब्ध होते. त्यामुळे घोड्यांचे उन्हापासून संरक्षण होते. व्यवहारातील खरेदी-विक्रीची फोटोसहीत संगणकीय पावती दिली जाते.

घोडेबाजारात २४ तास पाणी व वीज पुरवठा केला जातो. वेळोवेळी जंतूनाशकाची फवारणी केली जाते. तर वैद्यकीय तपासणीही केली जाते. घोड्यांसाठी लागणारा मुबलक ओला चारा आदी सुखसोयींनीयुक्त बाजारामुळे अकलूज घोडेबाजाराचे नाव अल्पावधीतच भारतात अग्रेसर झाले आहे.

अकलूजच्या घोडेबाजारामुळे तालुक्यातील अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घोडेबाजारामुळे हॉटेल, लॉज, मालवाहतूक, वाहनधारक, किराणा व्यापारी, चारा विक्रेते, घोड्याचे साज विकणारे व्यापारी आदी तत्सम घटकाला अधिकचा फायदा होतो.

त्यामुळे व्यावसायिकांना उत्पन्नाचा नवीन स्रोत प्राप्त झाला आहे. यावर्षी ७१० घोड्यांची आवक झाली असून २ ते ३ दिवसात ७०० ते ८०० घोडे दाखल होतील, अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमहाराष्ट्रबिहार