Join us

हिरवा चारा मिळत नसल्याने मुरघासाचा पर्याय; जनावरे हि आवडीने खातात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 3:35 PM

दुग्धव्यवसायात वाढ झाल्याने तसेच वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहत नसल्याने शेतकऱ्यांचा मुरघास बनविण्याकडे ओघ वाढला आहे.

शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. यामुळे हिरव्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यवसायात ६० ते ६५ टक्के खर्च हा केवळ जनावरांच्या चाऱ्यावर होतो. तसेच उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध करताना दमछाक होते. सर्वच शेतकऱ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने आता मुरघास बनविण्याकडे शेतकरी वळले आहेत.

मुरघास हा पोषणमूल्यांनी परिपूर्ण असून यात आंबविलेल्या चाऱ्यातील कोणतेही पोषणमूल्य नाहीसे होत नाही. उलट चवदार लागत असल्याने जनावरे  आवडीने तो खातात. मुरघास बनविण्यासाठी सध्या सगळीकडे मका पिकाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. मात्र या सोबत ज्वारी, नेपियर, आदी चार्‍यांपासून देखील उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो.

... असा तयार होतो मुरघास!

मुरघाससाठी चारा फुलोऱ्यात असतानाच शेतकरी कापणी करतात. मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये साधारणतः ६० टक्के ओलावा असतो. चारा सुकल्यावर कुट्टी मशिनच्या साह्याने त्याचे अर्धा ते एक इंचापर्यंत बारीक तुकडे केले जातात व प्रकियेसाठी मोठ्या पिशवीत भरून किमान २१ दिवस हवाबंद ठेवले जातात. त्यानंतर तो जनावरांना खायला घालण्यास सुरुवात केली जाते.

जनावरांना बाराही महिने हिरवा चारा देणे शक्य नसते. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना जनावरांचे दूध उत्पादन न घटता नियमित हवे असेल, तर त्यांना रोजच्या आहारात हिरवा चारा देणे आवश्यक आहे. तो नसल्यास मुरघास हा चांगला पर्याय आहे.

गल्लेबोरगाव परिसरात सर्रास शेतकरी मुरघासाचा वापर करीत आहेत. तो बनवून ठेवला की, रोजच्या रोज चारा आणण्याच्या कामाची व वेळेची बचत होते. कुट्टी करून मुरघास बनवत असल्याने चाऱ्यार्ची नासाडी थांबविणे शक्य होते. - शंकर दुधारे, शेतकरी, गल्लेबोरगाव जि. छत्रपती संभाजीनगर 

दुभत्या जनावरांसाठी लाभदायक

• दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मुरघास कोणत्याही हंगामात बनविता येते.

• उन्हाळ्यात मुरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येते. शिवाय, जनावरांचे आरोग्य नीट राखण्यासाठी मदत होते. तसेच चाऱ्याची बचत होते.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीगाय