अविनाश कदम
कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत.
सध्या सततच्या पावसामुळे ग्रामीण अथवा शहरी भागात डासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील जनावरे गोठ्यात ठेवतात. ओलसर जागा, सततचे पाणी व दमट वातावरणामुळे गोठे डासांचे आश्रयस्थान झाले आहेत.
गोठ्यातील दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुधाळ जनावरे चारा पुरेशा प्रमाणात खात नसल्याने पुरेशा प्रमाणात दूध देत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
दरम्यान, दुधाळ जनावरांमध्ये अशी लक्षणे दिसत असल्याने पशुपालक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करुन मार्गदर्शन घेत आहेत. गोठ्याची स्वच्छता राखून डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सल्ला देत आहेत.
फवारणीसाठी पैसा नाही
लहान पशुपालकांजवळ औषधांच्या फवारणीसाठी पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे डासांपासून दुधाळ जनावरांना मुक्तता कशी मिळेल या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. दुधाळ जनावरांनी चारा खाणे बंद केले, तसेच दूध पाहिजे त्या प्रमाणात देत नाहीत, त्यामुळे चिंता वाढली आहे. डासांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांना पडला आहे. - धनेश मुटकुळे, पशुपालक, मांडवा जी. बीड.
विषाणूजन्य आजार, घाबरण्याचे कारण नाही
• तिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी नर जनावरांत अधिक असते.
• तिवा हा डास चावल्याने होणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपाय करावेत. या आजारास डेंगी किंवा तिवा असेही म्हणतात.
• या आजारामुळे बहुतांश जनावरे तीन दिवस बाधित होतात व त्यानंतर निसर्गतः बरी होतात. बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य असले, तरी दुग्धोत्पादन आणि वळूच्या कार्यक्षमतेत प्रचंड घट होते.
उपचारानंतर तीन दिवसांत बरे होते पशुधन
डासांच्या चाव्यामुळे दुधाळ जनावरे अस्वस्थ होतात. काही जनावरांना तिवा आजारांची लक्षणे दिसतात तिवा विषाणूजन्य आजार आहे. उपचार केल्यानंतर तीन दिवसांत बरा होतो. या आजारामुळे जनावरे दगावत नाहीत. तर चारा खात नाही. त्याचा परिणाम दूध देण्यावर होतो. पशुपालकांनी घरगुती उपाययोजना म्हणून कडुलिंबाचा पाला जाळून त्याचा धूर गोठ्यात पसरविण्याची गरज आहे. - डॉ. मंगेश ढेरे, पशुधन विकास अधिकारी, आष्टी जि. बीड.
हेही वाचा - Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या