हिवाळा आल्यानंतर दुभत्या जनावरांची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण थंड वातावरणामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक नफा वाढवण्यासाठी काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत दुभत्या जनावरांची हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी.
संतुलित आहार
दुभत्या गायी आणि म्हशींना हिवाळ्यात अधिक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज असते. चाऱ्यात भुसभुशीत मका, हिरवा चारा आणि त्यात मेथीदाणे, गूळ आणि मोहरीचे तेल यांचा समावेश केल्याने प्राण्यांची ऊर्जा वाढते आणि दूध उत्पादन सुरळीत राहते. हे घटक त्यांच्या शरीराला गरम ठेवण्यास मदत करतात. या काळात पाण्याचेही योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
गोठ्याचे संरक्षण
गोठा थंडीत सुरक्षित ठेवण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे गोण्या किंवा ताडपत्रीने बंद करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच गोठा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा, कारण आर्द्रता आणि अशुद्धता जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. तसेच गोठ्यात तापमान नियंत्रण राखणे आवश्यक आहे ज्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळते.
तापमानाचे व्यवस्थापन
बंधिस्त गोठ्यातील जनावरांना सूर्यप्रकाशात बाहेर घेऊन जाणे देखील आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. तसेच हिवाळ्यात लहान जनावरांना गोणपाटाने झाकणे अधिक सुरक्षित आहे. ज्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळते.
आरोग्याची देखरेख
हिवाळ्यात जुलाब, न्यूमोनिया आणि इतर आजारांचा धोका वाढतो. या परिस्थितीत तातडीने पशुवैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच औषध उपचार करून जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल. तसेच नियमितपणे आरोग्य तपासणी आणि लसीकरण याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.
वरील प्रमाणे सर्व मुद्द्यांचे पालन केल्यास हिवाळ्यात दुभत्या जनावरांचे आरोग्य चांगले राहील आणि दूध उत्पादनात घट येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा टिकून राहू शकतो.