(छ.संभाजीनगर) जिल्ह्यातील सर्व पशुपालकांना यापुढे आपले पशुधनाच्या कानात बिल्ले असल्याशिवाय औषधोपचार करता येणार नाही तसेच खरेदी विक्री करता येणार नाही, अथवा त्यास प्रतिबंधीत करावे असे आदेश मा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणेस दिलेले आहे.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत NDLM-नॅशनल डिजीटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये पशुपालकांकडील सर्व पशुधनास इअर टॅगिंग (कानातील पिवळा बिल्ला) केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाईन करुन घेण्यास मदत होणार आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यक हे पशुपालकाच्या गोठ्यात जाऊन जनावरांना ईअर टॅगिंग च्या नोंदी करुन घेणार आहे. यामध्ये सदरील पशुधनाचे जन्म-मृत्यु नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.
म्हणजेच सदर प्रणालीवर जिल्ह्यातील सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म मृत्यु इ. सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सर्व पशुधनास कानात टॅग लावुन त्याची भारत पशुधन प्रणलीमध्ये नोंदणी आवश्यक असून, पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे कानात बिल्ले मारुन घेण्यासाठी त्वरित आपले नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. प्रदिप झोड तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केलेले आहे.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये १२ डिसेंबर २०२३ रोजीच्या केंद्र शासनाचे आदेश तसेच मा. आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांचे दि. १८.१२.२०२३ च्या आदेशान्वये राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी जेणे करुन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यास मदत होईल.
सदरील अधिनियमाचा प्रभावपणे अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने दि ०१.०६.२०२४ पासून जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगींग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्याबाबत सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसुल विभाग, वनविभाग, विदयुत महावितरण विभाग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कटक मंडळ, पोलिस विभाग, कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था इत्यादी यंत्रणेस मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशीत केलेले आहे.
ईअर टॅग नसल्यास पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार, व गावागावातील खरेदी विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास दि ०१ जुन २०२४ पासून प्रतिबंध करण्यात आलेले आहे. तसेच जन्मलेली वासरे व मृत पावलेली जनावरे तसेच विक्री केलेल्या पशुधनाच्या नोंदी ह्या भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक केले आहे.
ईअर टॅगबद्दल
- ईअर टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानात पिवळ्या रंगाचा एक प्लॉस्टिक बिल्ला (टॅग) लावला जातो.
- त्यावर जनावरांची ओळख दर्शविणारा १२ अंक असलेला क्रमांक असतो.
- या क्रमांकाच्या आधारे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैदयकिय अधिकारी हे पशुपालकाच्या गोठ्यात जाऊन त्या जनावरांवर केलेल्या कार्याच्या विविध नोंदी प्रत्यक्षात ऑनलाईनवर घेत असतात.
- सदरील नोंदी त्वरित केंद्र सरकारच्या भारत पशुधन पोर्टलवर अपलोड होत असते.
- यापुढे पशुपालकांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे, विविध आजार, साथीच्या रोगापासून संरक्षण देणे, चोरी तस्करी पासून संरक्षण करणे, शासकिय योजनांचा लाभ देण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालणे, अशा विविध बाबींसाठी टॅगींगचे फायदे होणार आहे.
माझ्याकडे एकूण १४ संकरित HF गाई तसेच २ बैल व ५ वासरे आहे, त्यांचे पासून दैनंदिन १६० लिटर दुध संकलित होत आहे व मी ५ रु अनुदानासाठी नोंदणी केलेली आहे. आमच्याकडे असलेल्या सर्व जनावरांच्या कानात बिल्ले मारुन घेण्याबाबत तसेच त्याचे पुढे दवाखान्याचे मार्फत होणारे फायदे, जनावरांची खरेदी व विक्री या बाबत आमच्या दवाखान्यातील डॉ. ज्ञानेश्वर बिडाईत साहेब यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले. त्यामुळे मी पुर्ण बिल्ले मारुन घेतलेले आहे. तसेच आमच्या बोलटेक गावामध्ये सुध्दा सर्व पशुपालकांना बिल्ले मारुन घेण्याबाबत सांगितलेले असून, सर्वांनी बिल्ले मारलेले आहे. - श्री. भिकन तात्या पवार पशुपालक, ग्रामपंचायत सदस्य, बोलटेक, चापानेर ता. कन्नड
आमच्या दवाखान्याच्या डॉक्टरनी प्रत्यक्षात गोठयावर येवून, माझ्याकडील एकूण 5 जनावरांना कानात पिवळे बिल्ले मारले व त्याच्या नोंदी माझे आधार कार्ड, मोबाईल नंबर सर्व माहिती घेवून त्यांचे मोबाईलवर नोंदविण्यात आली. तसेच लासुरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून मी मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार आमच्या बाजार समितीच्या सभेमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत सुचना देण्यात येतील. - श्री. विलास आप्पा सोनवणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासुर स्टेशन ता. गंगापूर, मु.पो. पाडळसा ता. गंगापुर
वैजापुर कृषि उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून मी आमच्या तालुक्यामधील जनावरांच्या बाजार असलेल्या बाजार समितीस यापुढे खरेदी विक्री करण्याचे आगोदर जनावरांचे कानात बिल्ले मारुन घेण्याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशानुसार आमच्या बाजार समितीकडून पत्र देण्यात येवून आदेशाची कडक अंमलबावणी करण्यात येईल. - श्री. गोरख प्रल्हाद आहेर संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर, मु.पो. पारळा ता. वैजापुर
अधिक वाचा: Animal Ear Tagging राज्यात २ कोटी ४४ लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण