राज्यात सध्या सर्वत्र थंडीचा प्रभाव संपून उन्हाचा पारा झपाट्याने वाढत आहे. सध्या तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसांत उष्णतेचा तीव्र प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
वाढत्या तापमानामुळे माणसांसोबतच जनावरांनाही उष्माघाताचा मोठा धोका असून, पशुपालकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आला आहे.
'गोठ्यात योग्य व्यवस्था करा!'
• गोठ्यात भरपूर खेळती हवा असावी.
• गोठ्यात सतत पाणी फवारावे, त्यामुळे तापमान कमी राहते.
• गोठ्याच्या छतावर पालापाचोळा, गवत टाकून त्यावर पाणी शिंपडल्यास गोठ्यात थंडावा राहतो.
• संध्याकाळच्या वेळी जनावरांना गोठ्यात ठेवताना सभोवताली ओलावा निर्माण करावा.
पाण्याची सुविधा गरजेची !
जनावरांना नियमित स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. पिण्याच्या पाण्यात गूळ व मीठ टाकून काठीने ढवळावे. हे मिश्रण जनावरांना उष्णतेमुळे येणाऱ्या अशक्तपणापासून संरक्षण देते. म्हशींसाठी पाण्यात डुबण्याची सोय करावी, त्यामुळे त्यांचे शरीर थंड राहते.
चारण्याची वेळ पाळा!
उन्हाळ्याचे दिवस पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यादरम्यान दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीत जनावरांना चरायला पाठवू नये. सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४ नंतर जनावरांना चरण्यासाठी सोडावे.
हेही वाचा : खर्च अन् वेळेत होईल बचत; रक्त तपासणीतून कळेल जनावरांच्या आजाराचे नेमके कारण