पुणे : राज्यात चारा टंचाई भासू नये आणि चाऱ्याच्या बाबतीत पशुपालक शेतकरी स्वयंपूर्ण व्हावेत या अनुषंगाने राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने मागच्या काही दिवसांपासून महत्त्वाची पावले उचलली आहेत. यामध्ये विविध योजना आणि चारा बियाणांची वाटप करण्यात येत असून पशुसंवर्धन विभागाचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.
दरम्यान, गावनिहाय वार्षिक चारा आराखडा बनवून संबंधित गावात पशुधनाच्या आधारावर प्रतिदिन व वार्षिक किती चाऱ्याची आवश्यकता आहे आणि किती चाऱ्याचे उत्पादन केले जाते याचा अंदाज घेऊन आवश्यक चारापिकांच्या लागवडीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना चारा बियाणाचे वाटप आणि चारा पिकांच्या उत्पादनासाठी विविध योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत.
राज्यामध्ये साधारणपणे ३ कोटी २८ लाखांचे पशुधन असून त्यासाठी १३ कोटी मेट्रीक टन हिरवा चारा तर ४.२५ कोटी मेट्रीक टन सुक्या चाऱ्याची वार्षिक गरज असते. पण राज्यामध्ये ७.५ कोटी मेट्रीक टन हिरवा चारा तर ३.२५ कोटी मेट्रीक टन सुका चारा उपलब्ध होतो. त्यामुळे ५.५ कोटी मेट्रीक टन हिरवा आणि १ कोटी मेट्रीक टन सुक्या चाऱ्याची कमतरता भासते.
ही कमतरता भरून काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलले असून मागच्या वर्षी म्हणजे २०२३-२४ या वर्षी ३९ कोटी रूपयांचा खर्च करून जवळपास १७ हजार क्विंटल चारा बियाणाचे वाटप करण्यात आले असून त्यापासून जवळपास २७ लाख मेट्रीक टन हिरवा चारा उत्पादित होणार असून यामुळे चंटाईवर पूर्णपणे मात करता आली नाही तरीसुद्धा चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी मोठा हातभार लागला आहे.
मार्च २०२४ अखेरपर्यंत पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडून एकूण ३९ कोटी ८८.४३ लाख रूपये निधी खर्च करून, १७ हजार ३१०.५९ क्विंटल वैरण बियाण्याचे वितरण करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील ५७ हजार ७०१.९७ हेक्टर क्षेत्रात वैरण पिकांची पेरणी होवून, २७.७१ लाख मेट्रीक टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे.
रब्बी आणि उन्हाळी हंगामात किती आहे चारा पिकांचा पेरा?कृषी विभागाच्या रब्बी हंगामाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार (१३ फेब्रुवारी २०२४ अखेर) राज्यात रब्बी ज्वारी १६ लाख १७ हजार ९९२ हेक्टर (सरासरीच्या ९२ टक्के), मका ३ लाख ४० हजार ८१० (सरासरीच्या १३२ टक्के), इतर रब्बी तृणधान्य १० हजार ४०७ हेक्टर (सरासरीच्या ९२ टक्के), अशी एकूण ३० लाख ९ हजार ५२४ हेक्टर (सरासरीच्या ९८ टक्के) पिकांची पेरणी झालेली आहे.
कृषी विभागाच्या दिनांक १५ एप्रिल २०२४ च्या अखेरच्या साप्ताहिक पेरणी अहवालानुसार उन्हाळी हंगामात राज्यात उन्हाळी मका ४७ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रात (सरासरीच्या ८२ टक्के), उन्हाळी ज्वारी २९ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रामध्ये (सरासरीच्या २३५ टक्के) आणि उन्हाळी बाजरी ३२ हजार ३५० (सरासरीच्या १५० टक्के) अशी पिकांची पेरणी झालेली आहे.
किती आहेत चाऱ्याचे दर?महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या दैनंदिन बाजार भावानुसार माहे जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कडब्याचे सरासरी दर रुपये १२४० प्रति क्विंटल होते. मार्च २०२४ मध्ये यामध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक घट होवून, सदर दर रूपये ५११ रूपये प्रति क्विंटल असे आहेत.