Animal Vaccination : पावसाळ्यामध्ये मानवात आणि पशुमध्ये साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या हंगामात पशुधनाची काळजी घेणे गरेजेच असते. रोगांच्या प्रादुर्भावामुळे पशु-पक्षांमध्ये होणारी मरतूक व त्यांची कमी होणारी उत्पादन क्षमता यामुळे शेतकरी, पशुपालकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशु-पक्षांमध्ये उद्भवणाऱ्या विविध विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
पशुधनामध्ये पावसाळ्यात लाळ्या खुरकूत, घटसर्प, फऱ्या, ब्रूसेल्लोसीस, लंपी चर्म रोग, ॲथ्रॅक्स, क्लासिकल स्वाईन फीवर, आंत्रविषार, पीपीआर, देवी, मानमोडी रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. लाळ्या-खुरकूत, ब्रूसेल्लोसीस, पीपीआर हे रोग प्रादुर्भाव पशुजन्य पदार्थ निर्यातीच्या दृष्टिने व आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आहेत. पशुसंवर्धन विभागाकडे आणि पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये या रोगांविरुद्ध परिणामकारक लसी उपलब्ध आहेत. तर पशुपालकांना जवळच्या पशुवैद्यक दवाखान्याला संपर्क करून जनावरांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडूनही विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शेवटी पशु उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, राज्यातील प्राण्यांना मोफत रोगप्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. या अंतर्गत लाखखुरकुताचे ९५ टक्के, PPRचे ७४ टक्के, LSDचे ८१ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
राज्यामध्ये पूर्ण झालेले लसीकरण
- FMD (लाळखुरकुत) लसीकरण फेरी ४ : राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम (NADCP) अंतर्गत १ कोटी ८५ लाख ८७ हजार ९४४ (९४.८६%) गायी आणि म्हशींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
- PPR फेरी १ : LHDCP अंतर्गत, गंभीर प्राणी रोग नियंत्रण कार्यक्रम (CADCP) अंतर्गत मेंढ्या आणि शेळ्यांसाठी ९८ लाख ९५ हजार ३७५ (७४.४८%) लसीकरण पूर्ण केले आहे.
- LSD नियंत्रणासाठी गोट पॉक्स लसीकरण : LHDCP अंतर्गत पशु रोग नियंत्रणासाठी गोवर्गीय पशुंमध्ये १ कोटी १२ लाख ९४ हजार ८०० (८१.००%) लसीकरण पूर्ण केले आहे.
- ब्रूसेल्लोसीस नियंत्रणासाठी फेरी १ : LHDCP अंतर्गत पशु रोग नियंत्रणासाठी गोवर्गीय (४ ते ८ महिने कालवडी) पशुंना २० लाख २ हजार ८४५ (६८.९०%) लसीकरण पूर्ण केले आहे.
- राज्य शासनाद्वारे आंत्रविषार (ETV) पशु रोग नियंत्रणासाठी शेळ्या व मेंढ्यांमध्ये ३४ लाख ९७ हजार ८०७ (७९.००%) लसीकरण पूर्ण केले आहे. तसेच HS + BQ, HS, BQ या महत्त्वाच्या पशु रोगांच्या नियंत्रणासाठी गाई व म्हैस वर्गीय पशुंमध्ये ९६ लाख १९ हजार ४९४ (८७.००%) लसीकरण पूर्ण केले आहे.
- ऑगस्ट महिन्यापासून राज्यात FMD (लाळखुरकुत) लसीच्या ५व्या फेरीस सुरुवात होत असून सर्व गाई व म्हशींना लसीकरण पूर्व जंतनाशक औषधी देण्याचे नियोजने करण्यात आले आहे.