Join us

Animal Vaccination : शेतकऱ्यांनो जनावरांचे लसीकरण करा! पशुसंवर्धन विभागाकडून मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 12:54 AM

पशुधनामध्ये विविध रोगाच्या प्रतिबंधाकरिता लसीकरण करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने लाळ खुरकूत, पीपीआर, घटसर्प, फऱ्या व लम्पी त्वचारोग या आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या आजारांचा समावेश होतो.

पुणे : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून राज्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने प्राधान्याने जनावरांचे लसीकरण करून घेणे आवश्यक असते. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून यासंदर्भात मोहीम राबवण्यात येत असून जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

दरम्यान, पशुधनामध्ये विविध रोगाच्या प्रतिबंधाकरिता लसीकरण करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने लाळ खुरकूत, पीपीआर, घटसर्प, फऱ्या व लम्पी त्वचारोग या आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या आजारांचा समावेश होतो. जनावरांमध्ये आवश्यक प्रतिबंधक लसीकरण वेळेत न केल्याने विविध प्रकारचे रोग प्रादुर्भाव दिसून येऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत असते.

राज्यातील महत्वाचे ५ महत्त्वाचे लसीकरण :

१. लम्पी त्वचा रोग - महाराष्ट्र राज्यात मागील दोन वर्षापासून या आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्याने त्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात सर्व पशू वैद्यकीय दवाखान्या मार्फत हे लसीकरण सुरू आहे. राज्यात सध्या या आजाराचे लसीकरण करण्यात येत असून काल अखेर एकूण ५८.६३ लक्ष म्हणजेच ४३ टक्के जनावरांना हे लसीकरण करण्यात आले आहे. जर हे लसीकरण १०० टक्के झाले नाही तर महाराष्ट्र राज्यात या रोगाचा मागील दोन वर्षापूर्वी सारखा भयकर उद्रेक होऊ शकतो अशी आशंका केंद्र शासनाने पत्राद्वारे वर्तविली आहे. या रोगाचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे.

सदर रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड इ.) होत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे, गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी तातडीने संपर्क साधावा.

२. लाळ खुरकूत (FMD): हा गायी व म्हशी मधील महत्त्वाचा आजार असल्याने यासाठी वर्षातून दोन वेळा राज्यातील सर्व गोवर्गीय व महिप वर्गीय पशुधनास लसीकरण करण्यात येते. राज्यात सध्या लाळ खुरकूत लसीकरणाची ४ थी फेरी पूर्णत्वास येत असून काल अखेर एकूण १८२.६८ लक्ष म्हणजेच ९३.२२ टक्के जनावरांना हे लसीकरण करण्यात आले आहे. या वर्षी महाराष्ट्र राज्याने FMD लसीकरणात आघाडी घेतली आहे. 

३. पीपीआर : हा शेळ्या-मेंढ्यांचा अत्यंत जीवघेणा आजार असल्याने यासाठी देशभरात पुढील चार वर्ष सलग या आजाराच्या विरुद्ध प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात सध्या पीपीआर लसीकरणाची पहिली फेरी चालू असून काल अखेर एकूण ९३.५७ लक्ष म्हणजेच ७०.४३ टक्के शेळ्या-मेंढ्यांना हे लसीकरण करण्यात आले आहे.

४. ब्रूसेल्लोसीस : म्हणजेच सांसर्गिक गर्भपात हा गायी व म्हशी मधील महत्त्वाचा आजार असून ह्या आजाराचा संसर्ग जनवारांपासून मानवासही होऊ शकतो. त्यामुळे ह्या आजाराच्या प्रतिबंधाकरिता राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ४ ते ८ महिन्याच्या कालवडी व म्हशींच्या पारड्यांना लसीकरण करण्यात येते, ज्याची प्रसिकरशक्ती जन्मभर टिकते. राज्यात सध्या ब्रूसेल्लोसीस लसीकरणाची पहिली फेरी चालू असून काल अखेर एकूण १९.६१ लक्ष म्हणजेच ६८ टक्के कालवडी व म्हशींच्या पारड्यांना हे लसीकरण करण्यात आले आहे.

५. घटसर्प व फऱ्या - या आजारांचे लसीकरण पावसाळ्याच्या पूर्वी करणे आवश्यक असते म्हणून यांना मान्सूनपूर्व लसीकरण असे म्हणतात. गायी व म्हशी तसेच शेळ्या-मेंढ्यांना हे लसीकरण करण्यात येते. राज्यात सध्या घटसर्प व फऱ्या या आजारांचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येत असून काल अखेर एकूण ३८.०७ लक्ष म्हणजेच २० टक्के जनावरांना हे लसीकरण करण्यात आले आहे.

पशु संवर्धन विभागाचा पशु रोग प्रादुर्भाव बाबत जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा :

पशु संवर्धन विभागामार्फत दरमहा राज्यातील सर्व जिल्ह्यांना रोग प्रादुर्भाव सतर्कतेचा इशारा देण्यात येत असतो. पुढील तीन महिन्यांचा इशारा पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे.

लसीकरणा बाबत जिल्हा स्तरावर प्राधान्याने कार्यवाहीचे आयुक्तालायचे निर्देश :

  • प्रतिबंधक लसीकरण वेळेत व लक्षांकित जनावरांना होण्यासाठी राज्यस्तरावरून सर्व पशुसंवर्धन विभागातील सर्व विभागीय, जिल्हास्तरीय तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
  • लसीकरण प्रभावी होण्यासाठी म्हणजेच केलेल्या लसीकरणाची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना लसीकरणापूर्वी जंत निर्मूलन करणे आवश्यक असते. त्यामुळे राज्यातील सर्व पशुवैद्यक संस्थांना आवश्यक जंत निर्मूलन औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.
  • सर्व आवश्यक असणाऱ्या लसी व त्याकरिता आवश्यक असणाऱ्या  बाबींचा पुरवठा क्षेत्रीय स्तरावर करण्यात आलेला आहे.
  • त्यामुळे राज्यातील सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, मान्सून उंबरठ्यावर असल्याने आपल्याकडील सर्व पशुधनास आवश्यक असणारे विविध रोगांसाठीचे लसीकरण तात्काळ करून घेऊन होणारे आर्थिक नुकसान टाळावे.
  • यासाठी अधिक मार्गदर्शनासाठी पशुधसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसाय