हिवाळ्यात जनावरांना सकस आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांच्या चयापचय क्रियेत वाढ होते तसेच शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित राहते.
अत्यधिक थंड वातावरणामुळे हिवाळ्यात जनावरांचे स्नायू आखडले जातात. त्यांची त्वचा करकरीत होऊ लागते आणि ते लंगडू लागतात. याचप्रमाणे अनेक वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन त्यांच्या रवंत क्रिया मंदावतात. हिवाळ्यात दूध काढताना जनावरांचे सडावर भेगा पडल्यामुळे रक्त येऊ शकते.
तर काही वेळा जनावरं दूध काढू देत नाहीत. थंडीत जनावरांची ऊर्जा गरज वाढते त्यामुळे त्यांना सकस आहाराची जास्त आवश्यकता असते. सकस आहाराची कमतरता असल्यास जनावरे अशक्त होतात आणि व्यवस्थित पान्हा सोडत नाहीत.
सकस आहाराची कमतरता दूध उत्पादनावर विपरीत परिणाम करते. तसेच यामुळे दुधाचा दर्जा कमी होतो आणि चिकाची प्रतही खालवते. पाण्याची कमतरता किंवा कमी पाणी पिण्यामुळे दूध उत्पादनात घट होते. खूप थंड वातावरणात ताण आणि कुपोषणामुळे अशक्त वासरे जन्मतात. यासाठी हिवाळ्यात सकस आहार देणे आवश्यक आहे.
हिवाळ्यातील सकस आहाराचे महत्त्व
पाणी पिण्याचे महत्त्व
थंड वातावरणामुळे जनावरे अधिक पाणी पित नाहीत. यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठी मीठ पिठ वापरून पाणी द्यावे. यासोबत कोमट पाणी देणेही आवश्यक आहे. तसेच गोट्यात उबदार वातावरण ठेवले तर जनावरे अधिक पाणी पिऊ शकतात.
चाऱ्याची तपासणी
हिवाळ्यात चाऱ्याची गुणवत्ता तपासून घेणे महत्त्वाचे आहे. चाऱ्याचा दर्जा चांगला असल्यास कुपोषणाची शक्यता कमी होईल.
अधिक अन्न सेवन
हिवाळ्यात जनावरांना अधिक अन्न सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे शरीर उष्णता आणि ऊर्जा तयार करू शकते. थंडीत उष्णतेची आवश्यकता असते त्यामुळे शरीराचे तापमान नीट राखण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे.
पेंड आणि गूळ देणे
जनावरांना त्यांच्या खाण्यात पेंड आणि गूळ द्यावा यामुळे त्यांचे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
जनावरांना ३:१ या प्रमाणात हिरवा व सुकलेला चारा देणे आवश्यक आहे. तसेच त्यांना लापशी खायला देणे, कोमट पाणी देणे, आणि रात्री ७ ते ८ वाजता चारा देणे महत्त्वाचे आहे.
चयापचय क्रिया आणि चारा उपलब्धता
थंडीत जनावरांची चयापचय क्रिया अधिक वाढते. त्यांना चारा पुरवताना चाऱ्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे. चारा व्यवस्थित उपलब्ध नसेल तर जनावरं अशक्त होण्याची शक्यता असते.
वरील विविध प्रकारे हिवाळ्यात सकस आहारामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते. तसेच त्यांचे दूध उत्पादन व गुणवत्ता सुधारते आणि त्यांचे शरीर उष्णतेसाठी योग्य ऊर्जा निर्माण करते. ज्यामुळे निश्चित पशूपालकांना आर्थिक फायदा होतो.
डॉ. एफ. आर. तडवी(कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर).
डॉ. महेश तनपुरे(सहायक प्राध्यापक कृषि महाविद्यालय बदनापूर).