कोल्हापूर : जिल्ह्यातील पात्र गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दहा दिवसांतील हे पैसे असून आणखी पाच हजार दूध उत्पादकांची परिपूर्ण माहिती दुग्ध विभागाकडे अॅपद्वारे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांना लवकरच अनुदानाचे पैसे मिळणार आहेत.
साधारणतः डिसेंबरपासून गाय दूध अतिरिक्त झाल्याने सर्वच दूध संघांनी दरात मोठ्या प्रमाणात कपात केली. पहिल्या टप्यात दोन रुपये कपात केली, बाजारपेठेत मागणी कमी आणि दूध जास्त झाल्याने दुधासह पावडर व बटरचा उठाव होईना म्हटल्यावर संघांनी दरात आणखी कपात केली.
राज्यातील बहुतांशी संघ २२ ते २८ रुपये लिटरपर्यंत दुधाची खरेदी करतात. राज्य शासनाने गाय दुधाचा हमीभाव प्रतिलिटर ३४ रुपये निर्धारित केला आहे; पण निर्धारित दरापेक्षा कमी पैसे मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली; मात्र त्यासाठी ढीगभर अटी घातल्या आहेत.
पशुधन टॅगिंग, दूध संस्थांचा कॅशलेस व्यवहार, दूध उत्पादकांचे बँक खाते आधारकार्डशी लिंकिंग करणे आदी अटी घातल्याने अनुदानाचा लाभ मिळण्यास विलंब झाला आहे.
राज्यात 'गोकुळ' दूध संघाने अतिशय प्रभावीपणे अनुदान योजना राबवली आहे. पहिल्या दहा दिवसांत (११ जानेवारी २० फेब्रुवारी) या कालावधीतील माहिती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पाण्यापेक्षा दूध झाले स्वस्त
सध्या, बिसलरी एक लिटर पाण्याची बाटलीसाठी २० रुपये मोजावे लागतात; पण राज्यात अनेक ठिकाणी यापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांकडून गाय दूध खरेदी केली जात आहे.
पाच हजार उत्पादकांची माहिती भरली असून त्यांना लवकरच अनुदान मिळेल. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती भरण्याचे काम गतीने सुरू आहे. - नामदेव दवडते (कार्यालयीन अधीक्षक, दुग्ध विभाग, कोल्हापूर)