बदलत्या सुखासीन जीवनशैलीमुळे जगभरात सांधेदुखीच्या वेदनांमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. एका अहवालानुसार ७ पैकी एका प्रौढाला या आजाराने ग्रासले आहे. 'कॉण्ड्रोयटिन सल्फेट' हे या आजारावरील औषध आहे. म्हशीच्या श्वसननलिका आणि कान यांच्या कार्टिलेजमधून (कुर्चा) 'कॉण्ड्रोयटिन सल्फेट' तयार करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) विकसित केली आहे. माफसूच्या या संशोधन प्रक्रियेला भारतीय पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. त्यामुळे सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्यांना दिलासा मिळेल.
चाळिशीचा उंबरठा ओलांडल्यानंतर ऑस्टियोआथ्रॉटिस लक्षणे आढळून येतात. या आजारावर प्रभावी औषधी शोधण्यासाठी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि माफसूच्या वतीने अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्पांतर्गत कॉण्ड्रॉयटिन सल्फेट निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
कॉण्ड्रॉयटिन सल्फेटचा अर्क हा कत्तलखान्यातील प्राण्यांच्या मृदू कार्टिलेजपासून तयार केला जातो. (उदा. म्हशीचे कान व शार्क माशाचे कार्टिलेज) माफसूच्या मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागात याबाबत तीन वर्षे संशोधन करण्यात आले.
ऑस्टियोआथ्रॉटिस म्हणजे काय?ऑस्टियोआथ्रॉटिस हा एक सांध्याचा रोग आहे. ज्यामुळे सांधे वेदनादायक आणि कडक होतात. शरीराचा कोणताही सांधा ऑस्टियोआथ्रॉटिसमुळे प्रभावित होऊ शकतो. हात, गुडघा आणि मांडी हे लहान सांधे सामान्यतः प्रभावित होतात.माफसूने म्हशीच्या श्वसनलिका आणि कान यांच्या कार्टिलेजमधून कॉण्ड्रोयटिन सल्फेट' तयार करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. यास पेटंटही मिळाले आहे. यामुळे विद्यापीठ आणि औषधनिर्माता कंपनीने सामंजस्य करार करून या संशोधनाला वास्तवात साकारणे शक्य झाले आहे.- प्रा. रवींद्र झेंडे, विभागप्रमुख, पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई