Join us

Artificial insemination of livestock : पशुधनाच्या देखभाल करण्यासाठी आता 'मैत्री' प्रकल्प; ग्रामीण भागात ठरणार फायदेशीर वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 12:24 PM

ग्रामीण भागातील बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ निर्मिती विषयावरील 'मैत्री' प्रकल्प राबविण्यात येत आहे वाचा प्रकल्पाची संपूर्ण माहिती (Artificial insemination of livestock)

Artificial insemination of livestock : 

अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेद्वारे ग्रामीण भागातील बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ निर्मिती विषयावरील 'मैत्री' प्रकल्प राबविण्यात येत असून, ३० युवकांनी तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील पशुधनाचे शास्त्रोक्त पद्धतीने कृत्रिम रेतन व्हावे, यासाठी तंत्रज्ञ निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता.

एक महिना प्रशिक्षण वर्ग आणि पुढील दोन महिने पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रत्यक्ष कार्यानुभव असे या प्रशिक्षणाचे स्वरूप होते. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. 

फायदेशीर पशुधन शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. कृत्रिम रेतन हे केवळ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच नाही, तर पशुधनाच्या अनुवांशिक सुधारणेसाठीही आवश्यक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन करण्यासाठी मैत्रीचे प्रशिक्षण घेतलेली प्रशिक्षित व्यक्ती योग्य मार्गदर्शन, उपचार करते.

त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या उद्दिष्टाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. पाटील यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनात मैत्री प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात आला.

काय आहे 'मैत्री' प्रकल्प

देशभरात कृत्रिम रेतन करण्यासाठी २ लाख १६ हजार तज्ज्ञांची आवश्यकता आहे. गावपातळीवर जनावरांना तत्काळ उपचार, कृत्रिम रेतनाकरीता पुरेशा सुविधा नसल्याने पशुपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन, देशभरात राष्ट्रीय पशुधन मंडळाकडून देशात विविध राज्यांमध्ये 'मैत्री' प्रकल्प राबविला जात आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन मंडळाच्या माध्यमातून 'माफसू' द्वारे होत आहे. या अंतर्गत तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

यांनी घेतले परिश्रम

सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे यांच्या अध्यक्षतेत आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांच्या उपस्थितीत अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण ३० तरुणांना प्रशिक्षण पूर्ण केले. जपानमधील अद्ययावत "काऊ मॉडेल''चा अभ्यासक्रमात अंतर्भाव होता. समारोपप्रसंगी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समन्वयक डॉ. श्याम देशमुख, डॉ. महेश इंगवले, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. प्रवीण बनकर, डॉ. सुधाकर आवंडकर आणि डॉ. आनंद रत्नपारखी यांनी काम पाहिले. पशुप्रजनन विभागातील कर्मचारी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :शेती क्षेत्रप्राण्यांवरील अत्याचारशेतकरीशेती