शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सुरू केला आहे. परंतु उन्हाळा सुरू होताच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाहीत आणि त्यातच आता चाराही महाग होऊन बसला आहे. तेव्हा जनावरांचा सांभाळ कसा करावा? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा, सोमठाणा, दाभडी, गिरगाव, बोराळा, कौठा, किन्होळा, महागाव, पिंपराळा, चौंडी आदी गावांतील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळले आहेत. काही महिन्यांपूर्वी दुधाला ६० रुपये प्रति लिटरवर दर मिळत होते. परंतु सद्य:स्थितीत ४० ते ५० रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. आजमितीस चारा महाग होऊन बसला आहे. २५ ते ३० रुपयास कडबा पेंडी बाजारात विक्री होत आहे. तसेच ढेप २९०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. चारा व ढेपेचे दर वाढताना दुधाचे दरही वाढणे अपेक्षित होते. परंतु दुधाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हिरव्या वैरणीचे दरही गगनाला भिडले आहेत. जास्तीचे पैसे देऊनही चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुभती जनावरे सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागामध्ये चाऱ्याचे दरही वाढत आहेत. गाय व म्हशीच्या दूध खरेदी दरासाठी कोणतीही वाढ होत नाही. त्यामुळे दुग्ध उत्पादक तसेच शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. दूध संकलन केंद्र धारकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी वाढीव दर तर मिळत नाही. यापूर्वी मिळत असलेला दरही व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भाताच्या पेंढयात अनेक पोषक गुणधर्म, जनावरांना खायला दिले तर..
जनावरे उपाशी राहताहेत हो साहेब...
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेळी, मेंढी, गाय, म्हैस खरेदी केले आहेत. परंतु सध्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे.- शेख गाँस, शेतकरी
एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाही. तर दुसरीकडे आता चाराही महाग होऊ बसला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती आहे. एप्रिल व मे महिन्यात काय हाल होतील, हे सांगणे कठीण आहे.- संजय गुळगुळे, शेतकरी