दुग्धव्यवसाय करत असताना दुधाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांकडून जनावरांची काळजी घेतली जाते. सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, गोळी पेंड, वेगेवेगळ्या कंपन्यांचे पशुखाद्य जनावरांना दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचा खर्च वाढतो पण अॅझोला ही वनस्पती जनावरांना दिल्याने दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये चांगली वाढ होते आणि शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा वाचले जातात.
जसं आपण जेवणासोबत लोणचे खातो त्याप्रमाणे पशुंना खाद्यामध्ये लोणच्यासारखा अॅझोलाचा वापर करता येऊ शकतो. ॲझोला ही दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त असलेली वनस्पती आहे. ॲझोला पाण्यातील शेवाळासारखी दिसणारी वनस्पती असून या वनस्पतीचा पाला जनावरांसाठी पोषक असतो.
दरम्यान, दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. हिरवा चारा खाऊ घालणे ही दूध उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची गुरूकिल्ली आहे. या आहारात अॅझोलाचा सामावेश केल्यास अनेक फायदे होतात असं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
काय आहेत अॅझोलाचे फायदे?
दुधाळ जनावरांना एका दिवसात दीड ते दोन किलो अॅझोला आहारातून दिला तर गाई किंवा म्हशीच्या दुधात दीड ते दोन लीटरने वाढ होते. त्याचबरोबर बॉयलर कोंबडीला अॅझोला दिला तर तिच्या अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते. त्याचबरोबर जनावरांमधील गाभण राहण्याच्या समस्या यामुळे कमी होतात.
किती असावे प्रमाण?
जनावरांच्या खाद्यामध्ये अॅझोलाचा सामावेश करत असताना गाय व म्हशींसाठी दीड ते दोन किलो प्रतिदिवस शेळ्या किंवा मेंढ्यांसाठी ३०० ते ४०० ग्रॅम प्रतिदिवस आणि कोंबडीसाठी २० ते ३० ग्रॅम प्रतिदिवस देणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात अॅझोलाचा सामावेश असल्यावर उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)