संभाजी मोटेवाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील शेतकरी इंद्रसेन गोरख मोटे यांच्याजवळील बैलाला (सोन्या) दोन डोळ्यांनी दिसत नसताना शेतामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राबत आहे.
वाळूज येथील शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या घरच्या गाईला २००५ साली हा सोन्या बैल जन्मला. सन २०१० सालापासून हा सोन्याने शेतामध्ये राबण्यास सुरुवात केली. अचानक शेतामध्ये काम करत असताना बैल दोन्ही डोळ्यांतून पाणी गळत असलेला दिसला.
तेव्हा शेतकरी मोटे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी शिनगारे यांना दाखविले असता दोन्ही डोळ्यांवर भरपूर प्रमाणात मांस वाढलेले आहे. त्यामुळे दोन्ही डोळे काढून ऑपरेशन करावे लागेल, असा सल्ला दिला.
डॉ. शिनगारे आणि डॉ. सचिन मोटे यांनी या सोन्या बैलाचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि आज १५ वर्षी झाले सोन्या शेतामध्ये काम करतोय.
दोन डोळे नसतानाही हा बैल बैलगाडीला पेरणीला कोळपणीला चालत आहे, असे प्रत्यक्ष दिसल्यावर शेतकरी येऊन भेट देतात आणि बैलाच्या पाठीवर शबासकीची थाप देतात.
बैलपोळ्याची परंपराबैलपोळ्याच्या दिवशी वृषभ पूजन करून बैलाच्या खांद्याला लोणी आणि हळद लावून खांदे मळणी केली जाते. शेतकऱ्यांचा हा मोठा सण आहे. दोन दिवस बैल स्वच्छ धुतली जातात, पोळ्या दिवशी सकाळी नवीन कंडे, गोंडा, कासरा, मोहरकी वेसन, वेंगूळ, बेगड, लावून बैल सजवला जातो. खिचिडा आणि गूळ दिला जातो. सायंकाळी गावातून मिरवणूक काढून बैलाचे विधिवत लग्न लावले जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
सध्या शेतीतसुद्धा यांत्रिकीकरण आले आहे. त्यामुळे बैलजोडी दुर्मीळ होत चालली आहे. तरी पण माझ्याकडे हा अंध बैल असून, दुसरी एक खिलार कोसा जोडी आहे. बैलपोळा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो. - इंद्रसेन गोरख मोटे, पशुपालक, शेतकरी