पुणे : बकरी ईद या सणाच्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणावर बोकडांची विक्री होत आहे. राज्यामध्ये लोणंद, मुंबई आणि चाकण येथे वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बोकड विक्री करण्यासाठी येत असतात. तर यंदा बोकडांनाही ईद निमित्ताने चांगला दर मिळत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, यंदा १७ जून रोजी बकरी ईद साजरा केला जाणार आहे. यासाठी मुस्लीम बांधव कुर्बानी (Qurbani) साठी बोकडांची खरेदी करत असतात. कुर्बानीसाठी एका वर्षापेक्षा जास्त वयाचा बोकड असावा लागतो. तर ईदच्या आधी बाजारात मोठ्या प्रमाणावर बोकडांची आवक होते.
चाकण बाजार समिती ही शेळ्या मेंढ्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ समजली जाते. या बाजार समितीमध्ये बकरी ईदच्या आधी चार ते पाच दिवस बोकडांची सलग विक्री केली जाते. यामुळे येथे लाखोंची उलाढाल होत असून शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
विविध जातींचे बोकड दाखलकुर्बानीसाठी बोकडांचा आकार मोठा, देखणा, चमकदार, जखम नसलेला आणि मजबूत असावा लागतो. तर शेतकरी बोकडांना चांगला खुराक देत असतात. चाकण बाजार समितीमध्ये सोजत, बीटल, उस्मानाबादी, आफ्रिकन बोर, काठियावाडी आणि गावरान जातीच्या बोकडांची आवक झाली होती. त्याचबरोबर कर्नाटक, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बाजारात हजेरी लावली होती.
१५ हजारांपासून ४० हजारापर्यंत दरबकरी ईद निमित्ताने बोकडांना १० हजारांपासून ४० हजारांपर्यंत दर मिळताना दिसत आहे. तर बोकड चांगला देखणा आणि शरीरयष्टीने दमदार असेल तर जास्तीचाही दर मिळत आहे. पण मटण कटिंगसाठी जो दर मिळतो त्यापेक्षा जास्त दर बकरी ईदच्या निमित्ताने मिळतो असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
व्यापाऱ्यांनाच जास्त नफा"शेतकरी बोकडाला वाढवतात आणि व्यापारी त्यांच्याकडून विकत घेतात आणि जास्त किंमतीत विकतात. जर आम्ही थेट शेतकऱ्यांकडून घेतले तर कमी पैसे द्यावे लागतील पण व्यापाऱ्यांना आम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतात." असं मत ग्राहक असलेल्या मुस्लीम बांधवाने व्यक्त केलंय.