यवत : बकरी ईद दोन दिवसानंतर असल्याने आजच्या यवत येथील शेळ्या मेंढ्याच्या आठवडे बाजारात हजारो बोकड व मेंढ्यांची आवक होऊन लाखो रूपयांची उलाढाल झाली. सोमवार (दि. १७) रोजी बकरी ईद असल्याने बाजारात प्रचंड गर्दी होती.
राज्यभरातून शेळ्या, मेंढ्या व बोकडाचे व्यापारी खरेदी साठी आले होते. बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांना मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी वर्ग देखील बकरी ईदच्या अगोदर त्यांचे बोकड विक्रीसाठी घेऊन बाजारात येतात.
मागणी वाढलेली असल्याने बोकडांचा दर देखील चांगला मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. आज बाजारात ७ हजार पासून ७५ हजार रुपये किमतीचे बोकड विक्रीसाठी आले होते. उस्मानाबादी, बोअर आदी जातीच्या बोकडांना चांगली मागणी होती. आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी यवत येथे शेळ्या मेंढ्याचा बाजार भरत असतो.
यावेळी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी खरेदी साठी येतात. मात्र बकरी ईदच्या अगोदरच्या शुक्रवारी संपूर्ण राज्यभरातून व्यापारी येथे येतात. त्याच प्रमाणात बोकड व मेंढ्या देखील विक्रीसाठी येत असल्याने लाखो रूपयांची उलाढाल या बाजारात होते.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत हा शेळ्या मेंढ्याचा बाजार असतो. आज सकाळपासूनच बाजारात मोठी गर्दी वाढल्याने पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे मेंढ्या घेऊन आलेली वाहणे वाहतुक कोंडीत अडकत होती. जिथे वाहणे थांबतील तेथे जाऊन व्यापारी बोकड खरेदी करण्यासाठी बोली लावत होते.
यवत गाव ते स्टेशन रोड दरम्यान संपूर्ण सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. बाजार मैदान पूर्ण भरल्याने ग्रामीण रुग्णालय समोरील मैदानात देखील बाजाराचे स्वरुप आले होते. गावरान कोंबड्या अंडी विक्रेत्यांनी सेवा रस्त्यावर विक्री चालू केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. याचबरोबर सेवा रस्त्यावर बाजार दिवशी थाटली जाणारी दुकाने डोकेदुखी ठरत होती.
बकरी ईद मुळे बोकडांचे भाव तेजीतबकरी ईद असल्याने आजच्या बाजारात राज्यभरातून व्यापारी आले होते. स्थानिक व्यापाऱ्यांप्रमाणे चढ्या दराने बोली लागत असल्याने कुर्बानीच्या बोकडांना चांगलेच दर मिळाले. सुमारे १० हजार मेंढ्या शेळ्या व बोकडांची खरेदी विक्रीचा आज झाली असल्याचा अंदाज यवत येथील व्यापारी फिरोज मुलानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.