Join us

बळीराजाचा झाला नाइलाज, दीड लाखाची सर्जा-राजाची जोडी विकावी लागतेय सव्वालाखात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 4:13 PM

चारा-पाणी टंचाईचे संकट गडद होत चालल्याने पशुपालकांना जनावरे सांभाळणे कठीण होणार आहे.

उन्हाचा पारा वाढत आहे. याचा परिणाम मानवी जीवनासह जनावरांच्या बाजारावर होत आहे. चारा-पाणी टंचाईचे संकट गडद होत चालल्याने पशुपालकांना जनावरे सांभाळणे कठीण होणार आहे. हंडरगुळी येथील जनावरांच्या बाजारात दीड ते दोन लाखांची बैलजोडी बळीराजाला नाइलाजाने एक लाखात विकावी लागत आहे. म्हैस मात्र ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे पशुपालक सांगतात.

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जलस्रोतांची पाणीपातळी खालावत चालली आहे. प्रकल्प, तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मार्च महिन्यात अशी अवस्था असल्याने एप्रिल, मे महिन्यात जनावरांना पाणी-चारा मिळणे कठीण होणार आहे. या भीतीने पशुपालक जनावरांची मिळेल त्या भावात विक्री करीत आहेत. दरम्यान, दुधाळ म्हशीला बाजारात वाढती किंमत असल्याचे दिसून येत आहे.

बैलजोडी एक लाखात

जनावरांच्या बाजारात गावरान बैलजोडीला चांगली मागणी असते. रंग व तेज पाहून भाव ठरवला जात असला तरी सध्या गावरान बैलजोडी एक लाख रुपयात विकली जाते.सर्जा-राजा सव्वालाखात चारा-पाण्याची चिंता असल्याने सर्जा- राजाची जोडी सव्वालाखात विक्री केली जात आहे. यंदा पाऊसकाळ चांगला असता तर दर आणखी वधारलेले असते.

८० हजारांपर्यंत भाव...

पशुधनाच्या बाजारात ८० हजारांपासून बैलजोडीचे दर आहेत, दीड लाख ते दोन लाखांपर्यंत उच्चांकी दर आहेत. पाऊस कमी असल्याने मिळेल तो भाव घ्यावा लागत आहे.

म्हशीच्या किमती ८० हजारांवर

हंडरगुळी येथील जनावरांच्या बाजारात किंवा शेतकऱ्यांच्या दावणीला कुठेही म्हैस असेल तर तिला चांगली मागणी आहे, आजघडीला चांगल्या म्हशीला ७० ते ८० हजार रुपये भाव आहे. मात्र, हिरवा चारा ज्यांच्याकडे उपलब्ध आहे तेच पशुपालक म्हशीची खरेदी करीत आहेत. देशी गाय मिळेना

देशी गायीचे दूध आरोग्यासाठी वर्धक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या जातीच्या गायींना चांगली मागणी असते. मात्र, देशी जातीची गाय तुरळक ठिकाणी दिसून येत आहे. चाराटंचाईमुळे भाव झाले कमी...

पावसाने हुलकावणी दिल्याने मुबलक पाणीसाठा नाही, वाळलेला व हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. चारा- पाणी टंचाईमुळे जनावरांचे भाव कमी झाल्याचे पशुपालक सांगतात.

पशुपालक म्हणतात....

काही वर्षापूर्वी चांगला भाव असायचा. नजरा थांबणार नाहीत अशी जनावरे विक्रीसाठी यायची. मात्र, दिवसेंदिवस जनावरांची संख्या घटू लागल्याने खरेदी-विक्री कमी पैशात होतेय. नाथराव सुरनर

यंदा चारा-पाणी टंचाईमुळे लाखांची जनावरे कमी भावात विक्री केली जात आहेत. आता तर सुरुवात असून, आणस्वी पशुधनाची विक्री वाढणार असल्याचे चित्र आहे. - शहाजी हाके, बोथी, ता. चाकूर

टॅग्स :दुग्धव्यवसायबाजार