हंडरगुळीच्या बाजारात लाखमोलाचा खरेदी विक्री व्यवहार करताना विश्वासार्हता महत्त्वाची आहे. काही ठिकाणी ती लोप पावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हंडरगुळी येथील जनावरांच्या बाजारात एक रुपयाच्या नाण्यावर पशुधनाचा लाख रुपयांचा सौदा केला जातो आणि त्यानुसार ठरवलेली रक्कम अदा केली जाते.
हंडरगुळी येथे निजामकालापासून जनावरांचा बाजार भरतो. येथील बाजारात देवणी, लाल कंधारी, गावरान, संकरित आदी जातींची जनावरे विक्रीसाठी येत असल्याने राज्यासह परराज्यातील शेतकरी, व्यापारी, पशुपालक येथे येतात. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस हा बाजार चालतो. विजयादशमीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथील जनावरांच्या बाजाराचा प्रारंभ होतो. एप्रिल, मे महिन्यापर्यंत बाजार भरतो.
सध्या हंडरगुळीचा बाजार बहरात येत आहे. जनावरांची खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून खरेदीदार येथील बाजारात येतात. जनावरे चांगली दिसल्यानंतर त्याचा सौदा केला जातो. पण हा सौदा करण्यासाठी काही मध्यस्थी नागरिक असतात. त्यातून चार पैसे मिळत असल्याने काही जणांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे. हा मध्यस्थी खरेदीदार व विक्रेता या दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन तडजोड करतो व बैलांची किंमत ठरवली जाते. एक रुपयाचे नाणे मुठीत धरून बैलांच्या पाठीवर ती मूठ थोपटून किंमत निश्चित केली जाते. तसे केल्यानंतर दोघांनाही विश्वास पटतो. नंतर ठरलेल्या वेळेनुसार पैशांचा व्यवहार केला जातो. त्यामुळे येथील बाजारात विश्वासार्हता आजही टिकून आहे.
बैलांची किंमत लाखाच्या घरात...
सध्या चांगल्या बैलजोडीची किंमत लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे. येथील बाजारात पशुधनास मागणीही चांगली असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या सगळीकडे दुधाचे दर कमी असतानादेखील बाजारात शेतकरी गाई खरेदी करतांना दिसून आले.