बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शिर्सुफळ ग्रामपंचायतीची मागणी विचारात घेत येथे नव्याने शेळी-मेंढी बाजाराचा शुभारंभ केला आहे. बारामती बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व सरपंच जुई हिवरकर यांचे हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या दिवशी ४५ शेळी-मेंढींची आवक झाली, तर २० मेंढ्यांची विक्री होऊन साधारण लाखाचे आसपास उलाढाल झाली. शेतकरी बाळू किसन हिवरकर यांच्या मेंढ्यास रु. १८००० रुपये दर मिळाला, तर विनोद गुलूमकर यांनी खरेदी केला. बाळू हिवरकर, महादेव म्हेत्रे, माणिक कांबळे या शेतकऱ्यांनी शेळी-मेंढी विक्रीस आणल्या होत्या.
बारामती बाजार समितीने राबविलेला हा स्तुत्य उपक्रम असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली सूचना व ग्रामपंचायतीची अनुमती यामुळे गावाच्या विकासात भर पडणार आहे, असे सभापती आटोळे यांनी सांगितले. समितीने सुरू केलेल्या या बाजारामुळे गावातील व परिसारातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली असून, भविष्यात शिर्सुफळ गावात बाजार समितीचा पेट्रोल पंप असावा, अशी मागणी केली.
त्यामुळे परिसरातील लोकांची व शेतकऱ्यांची सोय होईल, असे मत सरपंच हिवरकर यांनी भाषणात व्यक्त केले. यावेळी आप्पासो आटोळे यांनी समितीच्या उपक्रमाचे स्वागत करून त्याचा फायदा पंचक्रोशीतील लोकांना नक्की होईल, याबाबत समितीस पूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले.
यापूर्वी शिर्सुफळ व परिसरातील शेतकरी शेळी-मेंढी विक्रीसाठी यवत, भिगवण, काष्टी या ठिकाणी जात होते. त्यांची सोय बारामती तालुक्यात व्हावी, या उद्देशाने नेत्यांचे मार्गदर्शनाखाली शेळी-मेंढी बाजार सुरू करण्यात आला असल्याचे सभापती यांनी चर्चेत सांगितले.
यावेळी उपसरपंच हिराबाई झगडे, शिवाजी झगडे, बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र खलाटे, अनिल हिवरकर, बापूराव कोकरे, सतीश जगताप, संतोष आटोळे, अरुण सकट, तसेच दिलीप परकाळे, विलास कदम, अतुल हिवरकर, गणेश सातपुते, सोमनाथ हिवरकर, विजय शिंदे, आप्पासो झगडे, पोपट धवडे, सूरज हिवरकर उपस्थित होते.
थेट खरेदीदाराशी होणार संपर्क
• ग्रामीण भागात शेळी-मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय असून, त्यावर अर्थार्जन सुरू असल्याने त्याचा विचार करून आणि शेतकऱ्यांना गावातच योग्य बाजारपेठ व विक्री व्यवस्था व्हावी, म्हणून हा बाजार सुरू करण्यात आला आहे. यामुळे मध्यस्थ कमी होऊन शेतकऱ्यांना व विक्रेत्यांना थेट खरेदीदारांशी संपर्क साधता येणार आहे.
• परिणामी चांगला दर मिळण्याची संधी निर्माण होणार आहे, असे मत माजी सभापती सुनिल पवार यांनी मांडले. यापुढे प्रत्येक शुक्रवारी शेळी-मेंढी बाजार सुरू राहील. भविष्यात बाजारात विविध सुविधा पुरविल्या जातील.
• त्यामुळे पशुपालक आणि व्यापारी यांनी बाजारात शेळी-मेंढी विक्रीस आणावी, असे आवाहन सचिव अरविंद जगताप केले आहे.