पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात बैलपोळा सणाचे साहित्य खरेदीसाठी तळेघर येथे आठवडे बाजारात आदिवासी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या सर्जा-राजाप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करणारा हा सण असल्याने वस्तूंचे दर गगणाला भिडले असतानाही शेतकरी राजाने मोकळ्या मनाने बैलपोळा साहित्याची खरेदी केली.भाद्रपदी बैलपोळाआंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भाद्रपदी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या भागातील शेतकरी पूर्णतः शेतीवर अवलंबून असतात. यामुळे जवळपास सर्वच शेतकरी कुटुंबांकडे बैलजोडी आल्याचे पहावयास मिळते. वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण या भागांत मोठया उत्साहाने साजरा केला जातो. या भागात या सणाची सुरुवात आदल्या दिवसापासूनच होते. बैलपोळ्याच्या आदल्या रात्री शेतकरीबांधव बैलांच्या शिंगांना तेल लावून मालिश करतात. बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सकाळीच आंघोळ घातली जाते. दुपारी सर्व बैल गावातील देवळासमोर आणले जातात. येथे बैलांना विविध रंगांनी रंगवले जाते. अंगावर झुल गळ्यात कवड्यांच्या माळा, घुंगरू माळांचा साज चढविला जातो व संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते.संध्याकाळी अंगणात वाजत गाजत आलेल्या आपल्या या नंदी राजाला घरातली लक्ष्मी पंच पात्राने ओवाळून घरात केलेला पुरण पोळीचा नैवेद्य भरवते. घरात तयार केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना भरविल्याखेरीज घरातील कुणीही जेवत नाही. ही या भागातली परंपरा आहे. काही गावांतून दुसऱ्या दिवशीही बैलांची मिरवणूक काढली जाते.यंदा बैलपोळ्याचा सण १४ ऑक्टोबरला साजरा होत आहे. या सणानिमित्त आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अडिवरे व तळेघर येथील आठवडे बाजारात या भागांतील शेतकऱ्यांनी बैलपोळ्याचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. विविध रंग, घेरू, मोरक्या, घुंगरमाळा, शिंगांना लावण्याचे बेगडी कागद, तेल, चौरे कवड्याच्या माळा इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी तळे घर येथे आज शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे पहावयास मिळाले. महागाईच्या काळात वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.मातीच्या बैलांनाही मोठी मागणीखऱ्या खुऱ्या बैलांसोबतच घरात मातीच्या बैलाची पूजा करणे ही या भागातील परंपरा आहे. प्रत्येकाच्या गोठ्यात बैलजोडी असतानाही घराघरांत मातीच्या बैलांची पूजा आवर्जून केली जाते. पूर्वीच्या काळी घरोघरी येऊन मातीच्या बैलांची विक्री केली जायची. मात्र, आता ही प्रथा जवळपास बंद झाली असून मातीचे बैल खरेदी करण्यासाठी ही आठवडे बाजारात गर्दी झाली होती.पोळ्याच्या खरेदीसाठी लासुर्णे बाजार गजबजलाभाद्रपदी पोळा सणानिमित्त लासुर्णे (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. ११) आठवडे बाजार साहित्याने रंगबीरंगी झाला होता. सर्जा-राजाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केली होती.इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंक्शन, लासुर्णे, बोरी बेलवाडी, चिखली कुरवलीसह अन्य भागांमध्ये शेती व्यवसायाशी निगडित दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या भागातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. परंतु बैलांची संख्या कमी प्रमाणात दिसून येते. यांत्रिकीकरणाच्या बदलामुळे बैलांची संख्या कमी होत चालली आहे. शेतीतील मशागतीसाठी बैलाऐवजी तसेच छोटी यंत्रेदेखील बाजारात मिळत असल्याने शेतकरी याचा वापर जास्त प्रमाणात करतो. या कारणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. परंतु शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असल्याने या भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये दहा ते पंधरा जनावरे दिसून येत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करत असल्याने इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जनावरांची संख्या जास्त दिसून येते. त्यामुळे या आठवडे बाजारात बैलांसाठी लागणारे साहित्य जरी कमी खरेदी केले गेले असले तरी बाकीच्या जनावरांसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामध्ये विविध प्रकारचे दोरखंड, दावे, गोंडे, म्होरकी, कंडा, झुल्या बेगीड, हिंगुळ, आदी वस्तू खरेदीसाठी आल्या होत्या. या आठवडा बाजारामध्ये कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी, धाराशिव, अकलूज, वेळापूर आदी भागातून व्यापारी आले होते.यावेळी कुर्डुवाडी येथील कुमार गोसावी या व्यापाऱ्याने सांगितले की, भाद्रपदीपोळा हा फक्त पुणे जिल्ह्यातच असतो. आमच्या व्यवसायाचे साहित्य बाराही महिने प्रत्येक गावागावातील दुकानात मिळत असते. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. काही भागात तर पाऊस पडलेला नाही.
सर्जा राजाचा भाद्रपदी बैलपोळा ‘या’ भागात होतो साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 5:15 PM