अहिल्यानगर/शहादा : शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात अहिल्यानगर येथील 'बिग जास्पर' हा घोडा सध्या अश्व शौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक ६८ इंच उंच असलेला हा घोडा पाहण्यासाठी अश्वप्रेमी गर्दी करत आहेत.
सारंगखेडा यात्रोत्सवातील घोडेबाजारात २ हजार १२० घोड्यांची आवक झाली असून, सहा दिवसांत बाजारात ३८२ घोड्यांची विक्री झाली आहे. या विक्रीतून १ कोटी ७३ लाख १३ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली आहे.
दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरयाणा, बिहार राज्यातून घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या घोडेबाजारात यंदा 'बिग जास्पर' या घोड्याने लक्ष वेधले आहे.
अहिल्यानगरच्या राजवीर स्टडफार्म सांभाळ करत असलेला हा घोडा चर्चेचा विषय आहे. हा घोडा मारवाडी ब्लड लाइनचा आहे. त्याची उंची ६८ इंच असून, महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा घोडा असल्याचा दावा त्याचे मालक करत आहेत.
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांच्याकडे सांभाळ झालेल्या बिग जास्परला अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप व विद्यमान आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप यांनी खरेदी केला आहे.
या घोड्याची निगा राजवीर स्टड फार्म यांच्याकडून केली जात आहे. या घोड्याचे वय ९ वर्षे आहे. त्याची काळजी घेण्यासाठी पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्याच्या तपासणीसाठीचे वैद्यकीय पथकही वेगळे आहे.
बिग जास्परचा आहारही साधा आहे. त्याला रोज जेवणात करड्याची कुट्टी व चण्याचा खुराक आणि सात लीटर दूध दिले जाते. त्यामुळेच त्याच्या देखण्या रूपासोबत त्याची ब्रिड गुणवत्ताही उत्तम असल्याने, त्याची किंमत अधिक असल्याची माहिती देण्यात आली. घोड्याचा चेहरा, कान, मान, पुठ्ठा सर्वच आकर्षक आहे.
बिग जास्पर या घोड्याची किंमत १५ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. एवढी किंमत आली, तरच आपण त्याची विक्री करू. - सचिन जगताप, घोड्याचे मालक