Join us

मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात आली तेजी; खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:41 AM

पारंपरिक पद्धतीने बैलाद्वारे शेतीमशागतीची कामे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल

विदर्भासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथील बैलांच्या बाजारात गेल्या आठवड्यापर्यंत काहीशी मंदी होती. परंतु आता मान्सूनपूर्व पावसाचे लागलेले वेध पाहता शेतीमशागतीची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळपास १०० वर्षांचा इतिहास असलेल्या मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात बैल खरेदी- विक्रीचे व्यवहार वाढल्याचे गुरुवारी दिसून आले.

गुरुवारी भरणाऱ्या या बाजारात मोठ्या प्रमाणावर गुरे विक्रीसाठी आली होती. विदर्भ, मराठवाड्यासह बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर बैल येथे विक्रीसाठी आणण्यात आले होते.

मलकापूर पांग्रा येथील बाजारात बैलांच्या खरेदी-विक्रीची तगडी उलाढाल होते. शेतीमशागतीसाठी बैलाचा वापर कमी होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी वाढती महागाई व इंधनाचे दर पाहता पारंपरिक पद्धतीने बैलाद्वारे शेतीमशागतीची कामे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात येथील बाजारात अल्प प्रमाणात बैल विक्रीसाठी आले होते. परंतु १६ मेरोजी मोठ्या संख्येने व्यापारी व खरेदीदार आठवडी बाजारात आल्याचे दिसून आले.

७० हजार ते दीड लाखापर्यंत किंमत मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात सध्या गावरान व मध्यम उंचीच्या गोऱ्यांच्या जोडीची किंमत ७० हजार ते दीड लाख रुपयाच्या आसपास गुरुवारी दिसून आली. मोठे शेतकरी या जातीच्या बैलजोडी खरेदीला पसंती देतात.

मध्यम उंचीचे बैल ज्यांना गोरपे (गोन्हे) म्हणून संबोधतात. बुलढाणा जिल्ह्यासह जालना, अकोला, वाशिम या भागांतून शेतकरी व व्यापारी येथे बैल खरेदीसाठी आले होते. परिसरातील प्रसिद्ध असा हा बैलबाजार आहे.

हेही वाचा - कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान

टॅग्स :शेतीदुग्धव्यवसायशेतकरीविदर्भबाजारशेती क्षेत्र