प्रल्हाद देशमुख
विदर्भासह राज्यात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथील बैलांच्या बाजारात गत काही दिवसांपासून आर्थिक उलाढाल मंदावली आहे. वाढत्या तापमानासह लग्नसराईमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढल्याचे चित्र आहे.
मलकापूर पांग्रा येथील बाजारात बैलांच्या खरेदी-विक्रीची तगडी उलाढाल होते. मात्र, आता शेतकरीशेतीच्या उन्हाळी मशागतीच्या कामात व्यस्त असून, तापमानात वाढ झाली आहे. परिणामी मलकापूर पांग्रा बैल बाजारातील बैलांच्या खरेदी-विक्रीची उलाढाल मंदावली आहे.
शेतकऱ्यांच्या घरोघरी बांधून दिसणाऱ्या बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टर आणि चारचाकी मालवाहू वाहनांनी घेतली आहे. बैलांची संख्या घाटल्याने बाजारात लाखो रुपयांची उलाढाल कमी झाली आहे.
बाजार समितीला पाच ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न
प्रत्येक बाजाराच्यावेळी येथून दोनशे ते तीनशे गोरपे खरेदी करून व्यापारी नेतात. पण, सध्या व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मलकापूर पांग्रा व्यापाऱ्यासह इतरही व्यापारी येथे बैलजोड्या विक्रीला आणतात. खरेदी-विक्री व्यवहारातून कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच ते दहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, आता उत्पन्नात घट झाली आहे.
बैलजोड्यांची जागा घेतली ट्रॅक्टरने
शेतकऱ्यांच्या घरोघरी बांधून दिसणाऱ्या बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टर आणि चारचाकी मालवाहू वाहनांनी घेतली आहे. शेती कामासाठी बैलजोड्या आवश्यक असल्याने दरवर्षी नवीन बैलजोडी घेणे व जुनी बैलजोडी विकणे हे व्यवहार नित्यनेमाने सुरू राहत होते. परंतु आता ट्रॅक्टर आल्याने बैलजोडीचे काम कमी झाले आहे.
५० हजार ते दीड लाखापर्यंत किंमत
मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात सध्या गावरान व मध्यम उंचीचे गोहे विकण्यात येत आहेत. बैलजोडीची किंमत पन्नास हजारांपासून एक लाख पन्नास हजारांपर्यंत आहे. मोठे शेतकरी या जातीच्या बैलजोडी खरेदीला पसंती देतात. मध्यम उंचीचे बैल ज्यांना गोरपे (गोर्हे) म्हणून संबोधतात. या बैलजोड्या धान शेतीच्या कामाच्या असल्याने गोरपे (गोर्हे) खरेदीकरिता जालना जिल्ह्यातील मंठा, दुधा देऊळगावराजा चिखली खामगाव या भागातील शेतकरी व्यापारी मलकापूर पांग्रा बैल बाजारात येतात.
वाढत्या तापमानामुळे व लग्नसराईमुळे बैल बाजारावर परिणाम दिसून येतो आहे. - निसार पटेल बैल व्यापारी
हेही वाचा - नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध