पशुपालनामध्ये आहारावर जास्तीत जास्त म्हणजेच एकुण उत्पादित खर्चाच्या जवळपास ६५ ते ७० टक्के खर्च होतो. म्हणुन इच्छित उत्पादन मिळविण्यासाठी जनावरांच्या आहाराकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणुनच त्यांचा आहार परिपूर्ण, संतुलित राहील यावर भर द्यावा. जनावरांच्या आहरात प्रक्रिया केलेला खुराक, चारा, बायपास प्रोटीनयुक्त आहार, बायपास स्निग्धांशयुक्त आहार जनावरांना द्यावा. आपण माहिती करुन घ्यावयाची आहे ती बायपास प्रोटीनयुक्त आहाराची जो की आपण दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी संकरित गाईंना देतो.
बायपास प्रोटीन म्हणजे काय?
खाद्यातुन दिली जाणारी ही प्रथिने कमी प्रमाणात (रवंथ करणाऱ्या जनावरांच्या) कोटीपोटात विघटन (ऱ्हास) पावतात किंवा कोठी पोटातील विघटनाची (ऱ्हास होण्याची) प्रक्रिया टाळून खऱ्या पोटात जातात. अशा प्रथिनांना बायपास प्रोटीन असे म्हणतात. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या कोठीपोटातील सुक्ष्मजीवांकरिता काही प्रथिने आवश्यक असतात. तेवढीच प्रथिने बायपास प्रोटीनयुक्त कोठी पोटात उपलब्ध होतात आणि अधिकाधिक प्रथिने जनावरांच्या खऱ्या पोटात जातात. तेथे त्यांचे पचन पचनिय रसांव्दारे (Digestive Juices) पचन होऊन उच्च दर्जाची प्रथिने जनावरांकरीता उपलब्ध होतात.
बायपास प्रोटीनयुक्त आहार केव्हा द्यावा?
बायपास प्रोटीनयुक्त आहार जनावरांना देण्याकरीता जनावरांच्या दोन शारिरीक अवस्था महत्वाच्या आहेत. एक म्हणजे दुभते जनावर भरपुर दुध देते, ती अवस्था आणि दुसरी म्हणजे वाढणाऱ्या जनावरांची वाढ भरपुर, लवकर होत असल्यास त्या वेळेस हया दोन शरिरीक स्थितीमध्ये बायपास प्रोटीनयुक्त आहार देण्ययीच गरज असते. कारण अशा स्थितीमध्ये जनावरांच्या शरिरात तयार होणारी प्रथिने (Microbial Protein) जनावरांच्या गरजेच्या तुलनेत कमी प्रमाणात तयार होतात. भरपुर दुध देणारी असावी आणि भरपुर लवकर वाढीच्या हया दोन्ही शारिरीक स्थितीमध्य शरिराला मोठया प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. अधिक प्रथिनांच्या गरजेची परिपुर्तता करण्यासाठी बायपास प्रोटीनयुक्त आहार द्यावा लागतो.
दुसऱ्या परिस्थितीतील जनावरांना बायपास प्रोटीनयुक्त आहार द्यावयाची गरज भासते ती म्हणजे जनावरे जेव्हा अतिशय निकृष्ठ दर्जाच्या चाऱ्यावर वेगवेगळया पिकांचा भुसा त्या वेळेस या निकृष्ठ दर्जाच्या चाऱ्यापासुन जनावरांच्या शरिराला आवश्यक असणारे प्रथिने आवश्यक त्याप्रमाणे सुक्ष्मजीवांव्दारे तयार होत नाहीत. त्याकरिता अधिक उर्जेची गरज असते. अशा परिस्थितीत निकृष्ठ चाऱ्यावर युरियाच्या द्रावणाची प्रक्रिया केली जाते व त्यांचे पोषणमुल्य (प्रथिनांच्या बाबतीत) वाढविता येते. अशा प्रकारे निकृष्ठ दर्जाचा चाऱ्यावर, पिकांच्या अवशेषांवर युरियाच्या द्रावणाची प्रक्रिया करुन त्यासोबत बायपास प्रोटीनयुक्त संतुलित आहार दिल्यास जनावरांचे पालनपोषण व्यवस्थित होते. तव्दतच वाढ आणि दुध उत्पादनावर प्रतिकुल असा काहीही परिणाम होत नाही.
बायपास प्रोटीन कसे तयार करतात?
खाद्यातील उपलब्ध प्रथिनांचा रवंथ करणाऱ्या जनावरांच्या कोठीपोटातील सुक्ष्म जीवाणूंपासून सुरक्षित ठेवण्याकरिता त्यांना बायपास प्रोटीन बनविण्यासाठी विविध पध्दतीचा अवलंब करता येतो.
१) भौतिक पध्दत
शेंगदाणा पेंड, सोयाबिन पेंड इत्यादींना दोन तास १५० अंश से. तापमान देऊन त्यातील उपलब्ध प्रथिनांना बायपास प्रोटीन बनविता येते. हया करिता महागडी यंत्रणा लागते. तेल बियांपासुन तेल काढून पेंड तयार करण्याच्या प्रक्रियेस तापमान ९० ते ९५ अंश से. पर्यंत पोहचते त्यामुळे त्यातील उपलब्ध प्रथिने काही प्रमाणात बायपास प्रोटीन बनतात.
२) रासायनिक पध्दत
या पध्दतीमध्ये खाद्य घटकांवर काही रसायनिकांची जसे फॉरमॅलडिहाईडचा उपयोग करुन बायपास प्रोटीन तयार करता येते. परंतु ही पध्दत सर्वसामान्य शेतकऱ्यांकरिता तेवढी सोपी नाही तसेच फॉरमॅलडिहाईड या रसायनाच्या कर्करोग सदृश्य परिणामामुळे त्याचा उपयोग मर्यादित आहे.
३) इतर पध्दती
यामध्ये खाद्य घटकांवर झिंक सल्फट, झिंक क्लोराईडच्या कणांची (विद्युत जागृत) प्रक्रिया केली जाते. उदा. रक्त तसेच हायड्रोक्लोरिक आम्ल, अल्कधर्मी सोडियम हायड्रोक्साईड, अल्कोहोल इत्यादींची प्रक्रिया खाद्य घटकांवर करु बायपास प्रोटीन तयार करता येते परंतु आजतगायत या सर्व प्रक्रिया व्यावसायिकदृष्टया उपलब्ध नाहीत. निसर्गतः बायपास प्रोटीन उपलब्ध खाद्य घटकांचा आहारात सामावेश करुन त्या आहारातील बायपास प्रोटीनची उपलब्धता प्रथिने खऱ्या पोटात येतात आणि कोठीपोटातील सुक्ष्म जीवांपासुन सुरक्षित राहतात. ज्या घटकांत बायपास प्रोटीन्स अधिक प्रमाणात असतात अशी खाद्य घटके म्हणजे मका पेंड, सरकी पेंड, नारळाची पेंड, फिशमिल होय.
बायपास प्रोटीनयुक्त आहार दिल्यामुळे होणारे फायदे
- दुधाळ जनावरांकरिता बायपास प्रोटीनचे महत्व अधिक आहे.
- दुधाळ जनावरांना बायपास प्रोटीन दिल्यास दुध उत्पादनात वाढ होते अपेक्षित दुध उत्पादन मिळते. बायपास प्रोटीनयुक्त आहाराचा परिणाम दुभत्या जनावरांमध्ये बऱ्याच बाबींवर अवलंबुन असतो. जसे, उत्पादनावस्था, दुध उत्पादनाचे प्रमाण, शारिरीक स्थिती आणि इतर अन्न घटकांची उपलब्धता.
अधिक वेगाने वाढणाऱ्या वासरांकरिता बायपास प्रोटीनयुक्त आहार दिल्यास त्यांची वाढ वेगाने होते. वासरांचे वनज वाढते. कालवडी लवकर वयात येतात तसेच माजावर येतात. इत्यादी फायदे बायपास प्रोटीनयुक्त दुभत्या संतुलित आहार दिल्याने मिळतात. म्हणुन जनावरांच्या अधिक उत्पादनाकरिता त्यांना बायपास प्रोटीनयुक्त आहार बाजारात उपलब्ध आहे.
डॉ. सचिन व्ही. गायकवाड, प्रा. खांडेभराड पी. एन आणि प्रा. के. जी. सोळंकी
सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, औरंगाबाद
९८८१६४४३६५