Join us

Rabies पिसाळलेला कुत्रा जनावरांना चावला तर काय होऊ शकते?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:59 AM

Dairy farming and rabies: रेबीज हा बाधित जनावरांपासून माणसांना होणारा विषाणूजन्य रोग, जगामध्ये सध्या फार चर्चेत आहे.

रेबीज हा बाधित जनावरांपासून माणसांना होणारा विषाणूजन्य रोग, जगामध्ये सध्या फार चर्चेत आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे तिथे या रोगाचे निर्मूलन करणे अवघड जात आहे. हा रोग रेबिज विषाणूबाधित (पिसाळलेल्या) जनावरांच्या चावण्यामुळे त्यांच्या लाळेतून हा माणसांना किंवा इतर स्तनधारी प्राण्यांना होऊ शकतो.

रोगाचे प्रसारकहा रोग पिसाळलेले कुत्रे, मांजर किंवा जंगली प्राणी जसे मुंगूस, कोल्हे, लांडगे, माकड, वटवाघूळ यापासून पसरू शकतो. पण भारतामध्ये हा रोग कुत्र्यापासून मुख्यतः पसरतो. यामुळे चावलेला मोकाट कुत्रा (किंवा मांजर) हे पिसाळलेले आहे असे गृहीत धरले जाते.

लक्षणे दिसण्याचा कालावधीपिसाळलेले जनावर चावल्यापासून २१-८० दिवसांमध्ये रेबिजची लक्षणे दिसून येतात लक्षणे दिसून येण्याचा कालावधी हा जनावराने चावलेले शरीराचा भाग व चाव्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेले विषाणू यावर अवलंबून असतो, म्हणजेच जर कुत्र्याने तोंडावर चावले असेल तर लक्षणे लवकर दिसतील आणि पायावर चावलेले असेल तर लक्षणे उशिरा दिसतील. कुत्रे चावल्यानंतर विषाणू हे चाव्याच्या जागेवरून नसांमार्फत मेंदूकडे जातात व तेथून लाळग्रंथी व इतर अवयवांमध्ये पोहोचतो.

प्रसार- रेबिजचे विषाणू हे हवेतून किंवा रक्तातून पसरत नाहीत. रेबिज हा संतप्त (furious) किंवा मंद (dumb) प्रकाराचा असू शकतो.संतप्त प्रकारामध्ये जनावर हे आक्रमक व चिडचिडे होते. त्यांचा सामान्य स्वभाव हा एकाएकी बदलतो. थोडेही डिवचले गेल्यास ते आक्रमक होतात.पुढे झटके येऊन त्यांना पॅरालिसिस होऊ शकतो ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.मंद प्रकारामध्ये जनावरांच्या जबड्याच्या व घशाच्या स्नायूचा पॅरालिसिस होतो, ज्यामुळे त्यांची लाळ गळते व ते खाद्य खाऊ किंवा पाणी पिऊ शकत नाहीत.ते आक्रमक नसू शकतात व त्यांच्या लाळेशी संपर्क आल्यामुळे इतरांना रेबिजचा धोका असतो.

उपाययोजना- एकदा रेबिजची लक्षणे दिसून आल्यास त्या जनावराचा/माणसाचा मृत्यू अटळ आहे. यामुळे कोणतेही भटके कुत्रे किंवा मांजर हे पिसाळलेले असू शकते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.आपल्या जनावरांना कुत्रा चावल्यावर ती जखम स्वच्छ साबण पाण्याने धावत्या पाण्याखाली १५ मिनिटे धुतली पाहिजे.त्यानंतर लवकरात लवकर आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या जखमेमध्ये रेबिजविरुद्ध इमयुनोग्लोब्युलिन, अॅण्टिरेबिज लस व आवश्यक औषधोपचार केले पाहिजे.- अॅण्टिरेबिज लस ही कुत्रा चावल्याच्या दिवशी व त्यानंतर तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या व अठ्ठाविसाव्या दिवशी घेणे अनिवार्य आहे.जर आपल्या पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला रेबिजची लस अगोदर योग्य वेळेस दिली असेल तरी कुत्रे चावल्यावर त्यांना लस टोचणे गरजेचे आहे.- जर लसीकरण न केलेला कुत्रा आपल्याला किंवा आपल्या पाळीव प्राण्यास चावला तर चावलेल्या कुत्र्याला न मारता त्यावर आपण १०- १५ दिवस लक्ष ठेवणे गरजेचे आहे.आपल्या पाळीव कुत्र्याचे व मांजरीचे वय ३ महिने झाल्यास त्यांना आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने अॅण्टिरेबिजची लस योग्य वेळी देऊन घ्यावी.आपल्या पाळीव कुत्र्याची व मांजरीची नोंदणी करून घ्यावी.आपल्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरवताना त्याला नेहमी पट्टा घालणे.नियमितपणे कुत्रे व मांजरींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी अॅण्टिरेबिज प्री-एक्सपोजर लसीकरण करून घ्यावे.भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व त्यांची नसबंदी हा रेबिजला आळा घालण्याचा मुख्य पर्याय आहे.आपण जबाबदारीने कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे ज्यामुळे मोकाट कुत्र्यांचा जमाव कमी करता येईल.

अशा प्रकारे आपल्याला आपला व आपल्या जनावरांचा रेबिजपासून बचाव करता येईल.

डॉ. आशिष रणसिंगपशुधन विकास अधिकारी, वर्ग-१

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

टॅग्स :कुत्राडॉक्टरशेतकरीभारत