आता गाई, म्हशी मोठ्या प्रमाणात व्यायला सुरुवात होईल. अनेक पशुपालक हे वासरांची काळजी कशी घ्यायची, त्यांना चीक किती आणि का पाजायचा याबाबत जागृत असतात.
अजूनही याबाबतीत नेमकी माहिती पशुपालकांना मिळायला हवी, असं मला वाटतं. कारण एका पशुपालकाच्या आलेल्या फोनवरून त्याची मला जाणीव झाली. म्हणून हा नवजात वासराचे संगोपन आणि चीकाचे महत्त्व हा भाग आपल्या सर्वांसाठी.
आपल्या सर्वांना माहीत आहे की गाय नऊ महिने नऊ दिवस, म्हैस दहा महिने दहा दिवसांनी विते. साधारण पूर्ण दिवस भरत असताना सर्व पशुपालकांनी घरी हजर राहून त्यांचे विणे सुखकर कसे होईल, याची काळजी घ्यावी.
त्यासाठी प्रत्येक गाई, म्हशीसमोर संभाव्य विण्याची तारीख एखाद्या पाठीवर किंवा बोर्डवर लिहून ठेवावी. जेणेकरून त्या बाबतीत दक्ष राहून योग्य काळजी घेता येईल. गाई, म्हशी साधारण रात्री उशिरा किंवा पहाटे वितात. त्यांना देखील प्रायव्हसी हवी असते.
गाई आणि वासराची काळजी
- गाभण गाई, म्हशी गोठ्यात वेगळ्या बाजूला बांधून त्यावर नियमित लक्ष ठेवावे.
- हलका व्यायाम जर दिला असेल तर त्या नैसर्गिकरित्या वितात.अन्यथा अनेक वेळा वेताना अडथळा निर्माण होऊ शकतो.
- त्यासाठी सजग राहून नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन वासरू, रेडकू सोडवून घ्यावे.
- वासरू, रेडकू जन्माला आल्यानंतर ताबडतोब वासरू, रेडकू जन्माला आल्यानंतर ताबडतोब त्याचे नाक व तोंड साफ करून घ्यावे.
- त्याला आरामशीर श्वास घेता यावा म्हणून छातीवर हलक्या हाताने मालिश करावे.
- नाळेला पोटापासून दोन इंच अंतरावर स्वच्छ धाग्याने बांधून उर्वरित नाळ स्वच्छ कात्री अथवा नवीन ब्लेडने कापून टाकावे.
- जंतुसंसर्ग टाळण्यासाठी त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे.
चीक किती पाजावा?
- जन्मानंतर वार पडण्याची वाट न पाहता अर्ध्या तासाच्या आत वासराला चीक पाजावा.
- उशीर झाल्यास वासराची चीक शोषण्याची क्षमता कमी होत जाते.
- वासराच्या वजनाच्या दहा टक्के चीक हा वासराला मिळायलाच हवा.
- तो एकाच वेळी न पाजता दिवसातून तीन-चार वेळा समान भागात विभागून द्यावा.
- चीक हा पूर्णपणे वासरासाठीच असतो, हे लक्षात घ्या. त्याची योग्य गरज भागल्यानंतर तो आपल्यासाठी वापरायला हरकत नाही.
चीकाचे महत्व
- वासराची सुरुवातीला रोग प्रतिकारशक्ती कमी असते. म्हशीच्या नवजात रेडकात तर त्याची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. त्यासाठी हा चीक फार महत्त्वाचा असतो.
- त्याद्वारे नवजात वासराचे पोट साफ होते व आईकडून रोगप्रतिकारशक्ती ही वासराकडे संक्रमित होत असते.
- चीक हा वासरांना मिळालेली अमूल्य अशी नैसर्गिक भेट आहे.
- दुधाच्या तुलनेत त्यामध्ये चार ते पाच पट अधिक प्रथिने, दहापट अधिक 'अ' जीवनसत्त्व व विपुल प्रमाणात खनिजे असतात.
- त्यासाठी त्याच्या पिवळ्या रंगावरून त्याला द्रवरूप सोनं (गोल्डन लिक्विड) असेही संबोधतात.
साधारण तीन दिवस आपण फ्रीजमध्ये चीक साठवून ठेवू शकतो. फ्रिजरमध्ये सहा महिन्यांपर्यंत साठवता येऊ शकतो. अशा प्रकारे साठवून ठेवून अनेक वेळा वासरांना पातळ संडास लागते, त्यावेळी त्याचा वापर उपचार म्हणून देखील करता येतो.
असा बहुगुणी चीक पूर्णपणे वापरून वासराला पाजून उर्वरित चीक घरी वापरावा, त्यामुळे वासराचे जगण्याचे प्रमाण वाढते व त्यांचे दीर्घकालीन आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन
अधिक वाचा: Milk Fat : दुधाला फॅट कमी का लागते? वाढविण्यासाठी हे करा सोपे उपाय