येथील पंचायत समितीच्या पशुसवर्धन विभागांतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी पशुसंवर्धन विभागाच्या विविध नावीन्यपूर्ण वैयक्तिक लाभाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने ८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.
नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाकडून ५० टक्के अनुदान तर अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत दोन दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप, दहा शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप, एक हजार कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. या सर्व योजना वेगवेगळ्या आहेत. जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना शंभर कुक्कुट पिलांचे वाटप, २५ तलंगा व तीन नर वाटप होणार आहे. यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
या सर्व योजनांसाठी लागणारी कागदपत्रे
लाभार्थ्यांचा फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत, दारिद्र्यरेषेखालील असल्यास दाखला, ७/१२, ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८ (७/१२ उताऱ्यावर अर्ज भरणाऱ्याचे नाव नसेल तर दोनशे रुपयांच्या बाँडवर तहसीलदारकडे केलेले संमतीपत्र) यासह विविध दाखल्यांची आवश्यकता आहे.
ऑनलाईन अर्ज
संबंधित शेतकऱ्यांनी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२३ रोजीपर्यंत https.//ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, सहायक गटविकास अधिकारी कांबळे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व्ही. एस. बारापात्रे यांनी केले आहे.