Join us

Animal Ear Tagging राज्यात २ कोटी ४४ लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:30 AM

येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया ११४ टक्के पूर्ण झाली आहे.

पुणे : येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया ११४ टक्के पूर्ण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

शेळ्या व मेंढ्यांचे ७२ टक्के टॅग पूर्ण झाले असून, राज्यातून एकूण २ कोटी ४४ लाख पशुंचा यात समावेश करण्यात आला आहे. नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत 'भारत पशुधन प्रणाली'मध्ये ईअर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक केले आहे.

ईअर टॅगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येऊ नये. तसेच कत्तलखान्यात टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येऊ नये.

कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

राज्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ म्हशी असून, आतापर्यंत ६२ लाख २९ हजार ५०९ म्हशींचे टॅगिंग पूर्ण झाले आहे. तर ५६ लाख ३ हजार ६९२ गाई असून आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ८३ हजार ५१२ जनावरांचे टॅगिंग झाले आहे. ही संख्या जनगणना संख्येपेक्षा जास्त आहे.

केवळ नराला बिल्ला; अन्य जनावरांची नोंद• नवीन जन्माला येणाऱ्या पिल्लांमुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात आले. तर ८ लाख ६१ हजार ७७६ शेळ्या, १ लाख ४५ हजार ४४४ मेंढ्या आणि १३ हजार ९६३ वराह असे एकूण २ कोटी ३५ लाख ३४ हजार २१४ टॅगिंग झाले आहे.• शेळ्या व मेंढ्यांमध्ये टॅगिंग करताना कळपातील एका नराला बिल्ला लावला जात असून, त्या कळपातील अन्य जनावरांची केवळ नोंदणी केली जात असल्याने ही संख्या जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा: Animal Ear Tagging हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध

टॅग्स :दुग्धव्यवसायराज्य सरकारसरकारगायशेळीपालनकेंद्र सरकार