व्यावसायिक पशुपालन करताना पशुपालकांची मुख्य चिंता म्हणजे कमी खर्चात अधिक नफा मिळविणे. मात्र हे साध्य करत असतांना जनावरांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा आधिक उत्पादन पशूपालक घेत असतात. अशावेळी जनावरांची अधिक शारीरिक झीज होते परिणामी गुरे सतत आजारी पडतात.
यासाठी पोषण तत्वांनी समृद्ध आहार, गोठा स्वच्छता आणि विविध आजारांचे योग्य व वेळीच उपचार करणे देखील गरजेचे असते. जनावरांच्या आरोग्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास त्यांच्या पासून होणाऱ्या फायद्यात देखील घट होत असते.
फायद्यात घट नको म्हणून पशुपालक जनावरांमध्ये आजारपणाची लक्षणे दिसताच उपचार करतात. मात्र सतत उपचार करून देखील जनावरे ठीक होत नसल्यास अशावेळी त्यांची रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. रक्त तपासणी केल्याने काय फायदे होतात बघूया याची सविस्तर माहिती.
योग्य निदान व उपचार - रक्त तपासणीमुळे विविध आजारांचे अचूक निदान करता येते. शरीरातील विशिष्ट बदल आणि रोगजंतू ओळखून, योग्य उपचार घेणे शक्य होते. योग्य उपचारामुळे जनावरांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
खर्चाची बचत - रक्त तपासणीमुळे आजाराची वेळीच माहिती मिळते. परिणामी उपचारावर होणारा अतिरिक्त खर्च कमी होतो. किंबहुना चुकीच्या निदानामुळे अयोग्य उपचार करण्याचा अतिरिक्त खर्च टाळला जातो.
लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाय - आजारांची लवकर ओळख झाल्याने त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरण करणे सोपे जाते. ज्यामुळे पुढील हानी होण्यापासून वाचते.
आर्थिक फायद्यत वाढ - रक्त तपासणीमुळे पशुपालकांना अधिक नफा मिळवता येतो कारण कमी खर्चात अधिक फायदे मिळवता येतात. तसेच अनावश्यक उपचारांचा खर्च कमी होतो.
लहान पशुपालकांसाठी मदत - लहान (कमी गुरे असलेले) पशुपालकांना अनेकदा उपचारांवरील मोठे खर्च सहन करणे कठीण होऊन जातात. मात्र रक्त तपासणीमुळे, योग्य निदान व वेळीच उपचाराने या खर्चात बचत होऊन त्यांचे आर्थिक नुकसान टाळले जाऊ शकते.
डॉ. असरार अहमदसहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन(विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर).