महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागाने महाविद्यालयाच्या गेटवर शुद्ध देशी गाईच्या दुधापासून बनवलेल्या इन्स्टंट आईस्क्रीम आणि सॉफ्टीची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता शुद्ध आणि स्वस्तातील आईस्क्रीमचा आस्वाद घेता येणार आहे.
कृषी महाविद्यालयाच्या विविध विभागांकडून उत्पादनाची विक्री केली जाते. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, गांडूळ खत, उसाचा रस, लाकडी घाण्यातून काढलेले तेल अशा उत्पादनाची विक्री होत असते. त्यातच आता पशुसंवर्धन विभागाने इन्स्टंट आईस्क्रीम विक्रीस उपलब्ध करून दिली आहे.
विशेष म्हणजे, बाजारात उपलब्ध असलेल्या आईस्क्रीमच्या किंमती पेक्षा कमी भावात या आईस्क्रीमची विक्री केली जात असून विभागाच्या विद्यार्थ्यांकडून हे विक्री केंद्र चालवले जाते.
काय आहेत या इन्स्टंट आईस्क्रीमचे वैशिष्ट्ये?
सॉफ्टी आणि इन्स्टंट आईस्क्रीम बनवण्यासाठी देशी गायीच्या दुधाचा आणि सेंद्रिय ताज्या फळांचा वापर केला जातो. ग्राहकांना हवी ती आईस्क्रीम त्यांच्यासमोरच बनवून दिली जाते. त्याचबरोबर या आईस्क्रीम मध्ये कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नसून हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची काळजी घेतली जाते.
किती आहे किंमत?
बाजारात या आईस्क्रीमची किंमत 80 रुपये ते 250 रुपयापर्यंत आहे. तर या ठिकाणी नैसर्गिक आईस्क्रीम फक्त 50 रुपयांत मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारात सॉफ्टीची किंमत 50 रुपयांपासून पुढे आहे, पण महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावर सॉफ्टी फक्त 30 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.
कुठे मिळणार?
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मेन गेटवर या पदार्थांची विक्री केली जात आहे. त्याचबरोबर इतर फळे आणि भाजीपाल्याचीही या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत.