अतुल जाधवदेवराष्ट्रे: प्रचंड वाढलेली महागाई यामुळे त्रस्त झालेल्या गायदूध उत्पादक शेतकऱ्याला दूध दराचा मोठा फटका बसत आहे. गेल्या तीन महिन्यांत गाय दूध दर प्रतिलिटर पाच रुपये घसरले आहेत. तसेच दिवाळीला दूध दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांची दीपावली कडू होण्याची शक्यता आहे. ३४ रुपये दर देण्याचा सरकारी अध्यादेश दूध संघांनी केराच्या टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे, जून महिन्यात गाय दूध दराने ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.
यावेळी शासनाने अध्यादेश काढून गाय दूध दर कमीत कमी ३४ रुपयांपेक्षा कमी द्यायचा नाही, असे स्पष्ट केले. परंतु आदेश काढल्यापासून दूध दरात टप्प्याटप्याने घट होत गेली. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाच रुपयांनी गाय दूध दर कमी झाले. तर दिवाळीत दरात आणखी घसरण होण्याचे संकेत दूध संघाने दिले आहेत. सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे दूध संघांची मनमानी चालू आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रचंड वाढलेले पशुखाद्याचे दर, चाऱ्याचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. त्यातच सातत्याने दरातील घसरण आर्थिक गणित बिघडून ठेवत आहे.
खर्च ४२; मिळकत ३२ रुपयेकच्च्या मालाचे दर वाढल्याने कंपन्यांनी पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढविले आहेत. मात्र, गाय दुधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर ४२ रुपयांच्या घरात जाऊनसुद्धा दुधास प्रतिलिटर ३२ रुपयांवर समाधान मानावे लागत आहे.