जयेश निरपळ
गंगापूर : दुधाचे दर पडल्यामुळे शासनाने राज्यातील दूध उत्पादकांना मदत म्हणून प्रति लिटर ५ रुपये आणि नंतर ७ रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. (Cow Milk Subsidy)
या योजनेत जिल्ह्यातील १४ हजार ७०३ लाभार्थ्यांना ३२ प्रकल्पांमार्फत तीन टप्प्यात मिळून ७ कोटी ११ लाख २७ हजार लिटर दुधासाठी ३९ कोटी ९९ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. (Cow Milk Subsidy)
दुधाचे दर कोसळल्याने प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी दूध उत्पादकांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने ५ जानेवारी २०२४ रोजी गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. (Cow Milk Subsidy)
यानुसार पहिल्या टप्प्यात १० जानेवारी ते १० मार्च २०२४ दरम्यान जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत ४३८१ दूध उत्पादकांच्या ९४ लाख २७ हजार लिटर दुधास ४ कोटी ५२ लाख रुपये वितरित करण्यात आले. त्यानंतर सदरील योजना दुसऱ्या टप्प्यात १ जुलै ते ३०सप्टेंबर २०२४ राबविण्यात आली.
योजनेत सहभागी जिल्ह्यातील २९ प्रकल्पामार्फत १४ हजार १७८ लाभार्थी दूध उत्पादकांच्या ३ कोटी ६१ लाख लिटर दुधास एकूण १७ कोटी ७८ लक्ष रुपये अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. (Cow Milk Subsidy)
दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेऊन योजनेला पुन्हा तिसऱ्यांदा १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.या दरम्यानच्या दूध अनुदानाची रक्कम रुपयांवरून ७ रुपये करण्यात आली होती.
तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांतर्गत १४ हजार ७०३ शेतकऱ्यांच्या २ कोटी ५६ लाख लिटर गाईच्या दुधास एकूण १७ कोटी ६९ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ-मोरे यांनी दिली. भविष्यात योजनांचा लाभ घेण्यासाठी गायींचे एअर टॅगिंगवर रजिस्ट्रेशन करून घेण्याचे आवाहन मनीषा हराळ-मोरे यांनी केले आहे.
जाचक अटींचा अनेक शेतकऱ्यांना फटका
* जिल्ह्यात दिवसाला जवळपास ५ लाख लिटर गायीच्या दुधाचे संकलन होते. अनुदानासाठी सरकारने अनेक जाचक अटी लावल्या होत्या.
* पशुधनाचे आधार कार्ड शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे, शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे तसेच दुधाळ जनावरांची नोंदणी पोर्टलवर करणे आदी जाचक अटी सरकारने लादल्या होत्या.
* अनेक शेतकऱ्यांचे दूध हे घरातील एका व्यक्तीच्या नावावर जाते. तर गायीची नोंद घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याने जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
* १४ हजार ७०३ लाभार्थ्यांना ३२ प्रकल्पांमार्फत तीन टप्प्यांत मिळून ७ कोटी ११ लाख २७ हजार लिटर दुधासाठी ३९ कोटी १९ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
तिन्ही टप्प्यांतील तालुकानिहाय वितरित दूध अनुदान
तालुक | दूध (लिटरमध्ये | अनुदान रक्कम |
छ. संभाजीनगर | २ कोटी २४ लाख ५१ हजार | १३ कोटी ४५ लाख ९५ हजार |
कन्नड | १ कोटी ५५ लाख ७६ हजार | ८ कोटी ५९ लाख ८१ हजार |
खुलताबाद | २३ लाख ३३ हजार | १ कोटी २५ लाख ५८ हजार |
फुलंब्री | १ कोटी ९६ लाख ३३ हजार | १० कोटी ७१ लाख ९७ हजार |
गंगापूर | ४० लाख ४ हजार | २ कोटी ३७ लाख ५१ हजार |
वैजापूर | ५३ लाख ९ हजार | ३ कोटी २४ लाख ७० हजार |
सिल्लोड | ६ लाख ५ हजार | ३३ लाख ८५ हजार |
एकूण | ७ कोटी ११ लाख ४२ हजार | ३९ कोटी ९९ लाख ३९ हजार |