नुकतेच राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात मोहीम स्वरूपात नोव्हेंबर २३ ते डिसेंबर २३ या दरम्यान वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासलेल्या एकूण जनावरांपैकी ३० टक्के गाई-म्हैशी मध्ये वंध्यत्व आढळले आहे.
सखोल अभ्यासातून संतुलित आहाराचा अभाव, खनिज द्रव्यासह जीवनसत्वांचा अभाव व गर्भाशयाचा दाह अशी कारणे पुढे आली आहेत. आपल्या सांगली जिल्ह्यातील प्रजननक्षम जनावरांची संख्या ही एकूण ४,९६,७६६ आहे. त्यामध्ये संकरित गाई १,५२,२८२, देशी गाई ४५,०७० व म्हैशी २,९९,४१४ आहेत.
यापैकी तीस टक्के जनावरांमध्ये वंध्यत्व असेल तर जिल्ह्यातील एकूण प्रजननक्षम गाई म्हैशी पैकी १,४९,०३० गाई म्हैशीमध्ये तात्पुरते वंध्यत्व आहे. याबाबतीत सर्व संबंधितांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
वंध्यत्वाचे साधारणपणे दोन प्रकार असतात. एक कायमचे वंध्यत्व व दुसरे तात्पुरते वंध्यत्व, जे उपचाराने बरे होऊ शकते. पण त्यासाठी पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आजही पशुपालकाकडून सकस व संतुलित आहार दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे.
आपण मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतो. त्याला अजूनही व्यवसायिकतेचे स्वरूप आलेले नाही. आपल्या वैरणीच्या संकल्पना देखील वेगवेगळ्या आहेत. अनेक पशुपालक वैरणीसाठी म्हणून राखीव क्षेत्र ठेवत नाहीत. वैरण म्हणून द्राक्ष, डाळिंब बागेतील व बांधावरील किंवा गायरानातील निकृष्ट गवताचा वैरण म्हणून वापर करतात.
अधून मधून उपलब्ध होणारे मका, कडवळ याचा वापर देखील जोपर्यंत उपलब्ध होतो तोपर्यंतच करतात. वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत. साखर कारखाने सुरू झाले की मोठ्या प्रमाणात ऊस वाड्याचा वापर केला जातो.
बाजरीचे सरमड, मक्याचा वाळलेला चारा काही ठिकाणी गव्हाचे काड, सोयाबीन तूर याचे भुसकट खायला घातले जाते. यातून पोट जरूर भरते पण शरीर पोषण नक्कीच होत नाही. सोबत आपण जोपर्यंत दूध उत्पादन मिळते तोपर्यंत जसा उपलब्ध होईल आणि जो उपलब्ध होईल तो खुराक घालतो.
त्यामुळे योग्य अशा सकस व संतुलित आहारा अभावी कालवडी, रेड्या या वेळेवर माजावर येत नाहीत. गाई-म्हैशी देखील वेळेवर माज न दाखवता अनियमित माज दाखवतात. तसेच अनेक वेळा ठळक माजाची लक्षणे न दाखवल्यामुळे ती पशुपालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी कृत्रिम रेतन होत नाही.
वारंवार उलटल्यामुळे पशुपालक वैतागून नजीकच्या खोंडा कडे किंवा रेड्याकडे नैसर्गिक संयोगासाठी घेऊन जातात. त्यांचाही अनियंत्रित आणि अतिवापर केल्यामुळे व परिसरातील अनेक गाई म्हशींच्या मध्ये वापरल्याने अनेक संसर्गजन्य रोगाचा प्रसार होतो. गर्भाशयाचा दाह उत्पन्न होऊन वंध्यत्व निर्माण होते व 'वर्षाला एक वेत' ही संकल्पना मोडीत निघते.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: पशुपालकांनो वर्षाला एक वेत व्हायलाच पाहिजे ना.. मग हे करा