पशू आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकविण्यासाठी हिरवा चारा आवश्यक असते.
दर्जेदार हिरवा चारा अभावी गाभण गायींना कमजोर व रोगट वासरे निपजतात. जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास उत्तम खुराक देवून सुध्दा जनावरांचे उत्पादनक्षम वय व दुग्ध उत्पादनावर चांगला परिणाम होतो.
संकरीत नेपिअर सुधारीत वाण व वैशिष्ट्ये
या पिकाचे तीन वाण महत्वाचे आहेत फुले जयवंत, फुले यशवंत, फुले गुणवंत हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहेत.
१) फुले जयवंत (आर.बी. एन-१३)
- या वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्झॉलिक आम्लाचे प्रमाण हे १.९१ टक्के असते.
- त्यात प्रथिने १०.३५ टक्के, खनिजे १२.३२ टक्के स्निग्ध पदार्थ २.३८ टक्के तसेच एकूण पचनीयता ६१.८ टक्के तसेच पानांवर कुस कमी प्रमाणात असल्याने जनावरे आवडीने खातात.
- चारा कापणी नंतर पुन्हा जोमाने लांब, भरपुर वाढतो, पाने रुंद तसेच फुटवे मऊ, लांब होतात हे वाण वर्षभर कोणत्याही हंगामात लागवड करता येते, पहिली कापणी ९-१० आठवडे नंतरच्या कापण्या ३-७ आठवडे करता येतात वर्षभरात ८-९ कापण्या घेता येतात.
२) फुले यशवंत
- कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे, मऊ, लांब, रूंद पाने आणि अल्प प्रमाणात लव असते.
३) फुले गुणवंत
- चारा पालेदार, मऊ लांब व रूंद पाने, कापणीनंतर जोमाने परत होणारी वाढ, अधिक लांब भरपुर फुटवे.
- या वाणांमध्ये प्रथिने ९-१० टक्के, पचनीयता ५६ टक्के ऑक्झॉलिक आम्ल २.०५ टक्के इ. घटक आढळतात.
लागवड पद्धत
- या गवताची लागवडीसाठी ठोंबे लावावीत.
- लागवडीसाठी साधारणपणे ३ महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा वापर करताना खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश (२/३) भागातील २ ते ३ डोळे असणारे कांड्या काढून लागवड करावी.
- या गवताची लागवड ९० x ६० सें.मी. (३ x २) फुट अंतरावर करावी. गवताचे ठोंब ९० सें.मी. अंतरावर (३ फुट) काढलेल्या सरीच्या बगलेत मुळासहित गवताची ठोंब डोळे असणाऱ्या कांड्याद्वारे लागवड करावी.
- दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहिल अशा पद्धतीने लागवड करावी.
- दोन झाडांमध्ये २ फुट (६० सें.मी.) अंतर ठेवावे.
- एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्टरी १८५०० ठोंब पुरसे होतात.