Join us

दुर्गम भागात 'अझोला' पशुखाद्याची संस्कृती, दुधात प्रति जनावर होतेय 'एवढी' वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 2:31 PM

दुध उत्पादनात होते १५ ते २० टक्के वाढ

सातपुड्यातील नैसर्गिक वातावरणात संगोपन झालेल्या पशूंना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. यातून या ठिकाणी होणारा पशुपालनाचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत वाढत आहे. यातून पशूंची संख्याही वाढली आहे. पशूंच्या वाढलेल्या संख्येला पूरक असे खाद्य देण्यासाठी पशुपालक प्रयत्नशील असून चांगल्या दर्जाचे खाद्य निर्माण करण्याच्या या शोधात 'अझोला' ही शेवाळवर्गीय वनस्पती सध्या सहाय्यकारी ठरत आहे.

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील गौऱ्या पाटीलपाडा (ता. धडगाव) येथील दिलवरसिंग मोना पराडके यांनी 'अझोला' या शेवाळवर्गीय खाद्याची निर्मिती सध्या सुरू केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या ५० शेळ्यांसाठी या वनस्पतीचा खाद्य म्हणून उपयोग करण्यात येत आहे.

हिरवागार अशा 'अझोला'मध्ये ३५ टक्के प्रोटिन आहे. अझोला खाद्य लावण्यासाठी दिलवरसिंग पराडके यांनी घराच्या मोकळ्या जागेत मोठा खड्डा तयार केला आहे. या खड्डयात ताडपत्री पसरवत त्यात भुसभुशीत माती व वाळलेले शेणखत टाकून पाणी सोडून दिले आहे. या पाण्यावर तरंगणारा केरकचरा काढून त्यावर अझोलाचे कल्चर बियाणे टाकले आहे. या बियाण्यातून दर तीन दिवसांनी हिरवागार असा पाला वर येत आहे. हे खाद्य हाताने तोडून ते शेळ्यांना खायला देत आहेत. या खाद्यामुळे शेळ्यांचे योग्य प्रमाणात पोषण होऊन त्यांच्यातील दुधाची आहे.मात्रा वाढण्यास मदत होत आहे. केवळ शेळ्याच नव्हे, तर इतर पशूंनाही अझोला लाभदायक ठरत आहे.

जनावरांसाठी अझोला चाऱ्याचा काय फायदा?

  •  अझोला मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मग्नेशियम हे उपयुक्त खनिज पदार्थ परिपूर्ण असतात.

अझोला घन आहारात मिसळून जनावरांना देऊ शकतो. जनावरांचा चारा गुणकारी व परिणामकारक बनविला जातो. 

  •  'अझोला कल्चर' हे तालुका कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. प्रकल्प सुरू करायला लागणारी गुंतवणूकही कमीच आहे. प्रकल्प उभारणी खर्च ३०० ते ४०० रुपये प्रतिखड्डा असून, हा खर्च फक्त एकदाच करावा लागतो. ही वनस्पती जनावरांना फायदेशीर आहे. 
  •  दुग्ध उत्पादनात १५ ते २० टक्के (अर्धा ते एक लिटर प्रति जनावर) वाढ होते. प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २० ते २५ टक्क्यांनी कमी होतो. दुभत्या जनावरांसोबतच ही वनस्पती मांसल कोंबड्या तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांनाही पुरवून उत्पादन वाढवू शकतो. याचबरोबर शेळ्या, मेंढ्या यांना पुरविल्यास त्यांच्याही उत्पादनात चांगली वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली.
टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरी