Dairy farming under Kamdhenu Dattak Gram Yojana milk scheme जिकडे-तिकडे शेतकऱ्यांची विदारक स्थिती असताना पारंपरिक शेतीतून उत्थान होत नसतानाही कर्जाचे डोंगर घेऊन संसाराचा गाडा रेटताना शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची मदत घ्यावी लागते. शेळीपालन, दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन केले जाते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असताना दुसरीकडे ज्या गावाला ‘कामधेनू दत्तक ग्राम’ म्हणून स्वीकारण्यात आले, त्या गावातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करून दूध उत्पादनावर भर देण्यात आला. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील कामधेनू ग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या गावातील दूध उत्पादन पूर्वीपेक्षा २० टक्क्यांनी वाढले आहे.
गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी. गाय, म्हशीपालनाला तांत्रिक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात कामधेनू दत्तक ग्राम योजनेतून त्या गावात पूर्वीच्या तुलनेत २० टक्के दूध उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेतीला पूरक जोड देणारा दुग्धव्यवसाय वाढविला आहे. ३०० पैदासयोग्य पशू असणाऱ्या या गावांची पशुगणना करून त्या गावांची कामधेनू दत्तकग्राम म्हणून निवड करण्यात आली.
पशुगणना करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाला कामधेनू दत्तकग्राम म्हणून पशुसंवर्धन विभाग स्वीकारते. ज्या गावाला दत्तक घेतले, त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे; दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल, जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधे, गोचीड, शेतकऱ्यांची सहल नेणे, नावीन्यपूर्ण उपक्रम, संकरित वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाऱ्याचे व खतांचे व्यवस्थापन करण्यात येते.
या दत्तक गावाला वर्षासाठी एक लाख ५२ हजार रुपये त्या गावाला जनावरांच्या संवर्धनासाठी देण्यात येतात. गावातील सर्वाधिक पशुमालकाला पशुमालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. तसेच त्या मंडळाची ‘आत्मा’ या संस्थेत नोंदणी केली जाते. शेतकऱ्यांचा व पशुमालकांचा आर्थिक विकास कसा होईल, यावर यातून चर्चा घडवून आणली जाते.
अधिकाऱ्यांचा रात्री मुक्काम कामधेनू गावातील शेतकऱ्यांना व पशुमालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले व त्यांचे इतर अधिकारी त्या गावात एक दिवस रात्रीचा मुक्काम ठोकतात. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल, यावर मार्गदर्शन करतात. कामधेनू गावात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ. पटले यांनी सांगितले.