नितीन कांबळे
शेतीला जोडधंदा म्हणून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायाकडे वळाला असून, दुधाला मिळणारा कमी दर चाऱ्याची होणारी मारामार, विकतचा चारा, औषध पाण्यावरील वाढता खर्च, यामुळे शेतकऱ्यांसह दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून, खर्च जास्त अन् उत्पन्न कमी अशी अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मराठवाड्यातील (Marathawada) शेतकऱ्यांचा शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे कल आहे. कोरोनानंतर तीन वर्षापासून दुधाला नसलेले भाव, पशुखाद्याचे वाढलेल्या दरामुळे शेतकरी जेरीस आला होता.
जनावरे विकावी म्हटले, तर भाव कवडीमोल अशा अडचणीत जनावरे संभाळली. दुभती जनावरे सांभाळताना खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था निर्माण झाली आहे.
दुधाला दिलेल्या हमीभावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. गाय व म्हशीच्या दुधाला सध्या प्रति लीटर पाच रुपयांचे शासकीय अनुदान मिळते.
दुभत्या जनावराची किंमत एक लाख!
शेतकऱ्याकडे दुग्ध व्यवसायासाठी वेगवेगळ्या जातीची दुभती जनावरे असल्याने आठवडी बाजारासह, व्यापाऱ्यांकडे दुभत्या जनावरांची किमत लाखांच्या पुढे आहे, तरीही शेतकरी खरेदी करीत आहेत.
ऊस मिळणे, वाहून नेणे अवघड
* हिरवा चारा म्हणून ऊस आणि मका हे सध्या मिळत नाही. जर कुठे मिळाले, तर वाढता भाव आणि वाहतूक करणे अवघड होत असल्याने हिरवा चाऱ्याची अडचण भासत आहे.
* ३५ रुपये लिटर गायीच्या तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपये प्रतिलिटर भाव दूध डेअरीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो; परंतु हा दर परवडत नसल्याचे सांगण्यात येते.
विकतच्या चाऱ्यावर जनावरे कशी पोसणार?
उन्हाळा लागला असून, आजस्थितीत पाणी उपलब्ध आहे. थोड्या-फार प्रमाणात चारा आहे; पण पुढील महिन्यात पाण्याची टंचाई निर्माण होईल, अशी स्थिती असल्याने विकतच्या चाऱ्यावर जनावरे पोसायची कशी, हा प्रश्न कठीण होणार आहे. दरवर्षी पाण्याची मारामार ही कायमच सुरू आहे.
औषधींचा खर्च कसा उचलणार?
जनावरांचाही वैद्यकीय खर्च असतो. लसीकरण आणि आवश्यक औषधोपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन अधिकाऱ्याची मदत घेतली जाते, तसेच कधी कधी खासगी पशुवैद्यकीय सेवा करणाऱ्याचीही ऐन वेळी मदत घ्यावी लागते. होणारा थोडा-फार खर्च हा पदरमोडीतूनच करावा लागतो.
पशुखाद्याचे दर डोक्याच्या वर
बाजारात सरकी पेंडच्या बॅगचा दर १,७०० रुपये असून, ३४ रुपये किलो दराने विकली जाते. खापरी पेंडच्या बॅगचा दर १,७०० ते २,९०० रुपये असून, ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव आहे. सुग्रास बॅगची किंमत १,३०० ते १,७०० रुपये असून, ३० रुपये प्रति किलो दराने विकली जाते.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. मात्र दुधाला योग्य भाव नसल्याने महागडे पशुखाद्य घेऊन दुभती जनावरे जगवावी लागतात. जनावरांचा सांभाळ करताना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे. - अंबादास आंबेकर, शेतकरी, देवीनिमगाव
जनावरे संभाळायचे म्हटले, तर लयं अवघड झालंय. चारा, पशुखाद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्या मानाने दुधाला भाव नाहीत. आता कुठेतरी थोडा गाडा सुरळीत झालाय. दुधाला हमीभाव असला पाहिजे. - लक्ष्मण कर्डीले, शेतकरी, डोंगरगण