दुग्धव्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बदलते हवामान, वाढती उष्णता, कमी झालेले दुधाचे दर आणि दुधाची उत्पादन क्षमता यावर मात करत दूध उत्पादक शेतकरी तग धरून उभा आहे. त्यातच शेतकऱ्यांचा पशुधन सांभाळण्यासाठीचा खर्च भरमसाठ वाढला आहे. पण आपण घरगुती उपायातून जनावरांच्या खाद्यावरील खर्च कमी करू शकतो. पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन सल्लागार डॉ. प्रशांत योगी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईबरोबर जनावरांच्या खाद्यावरील खर्च चांगलाच वाढला आहे. पशुखाद्याचे दरही वाढले असल्यामुळे जनावरांना सांभाळणे कठीण झाले आहे. पण जनावरांच्या खाद्यावर होणारा खर्च आपण घरगुती उपायांतून करू शकतो. आपण घरी जे अन्न खातो त्यातूनच जनावरांच्या खाद्यावरील खर्च कमी करू शकतो.
शेतकरी आपल्या शेतात फळे, भाजीपाला, अन्नधान्य पिकवतो पण त्यातील बरेच अन्न, भाजीपाला आणि खराब फळे वाया जातात. भारतात वाया जाणाऱ्या अन्नाची किंमत ही वर्षाकाठी १३ हजार कोटी रूपये एवढी आहे. वाटाणा, गाजर, मेथी अशा भाज्या आपण खाल्ल्यानंतर त्यांचा उर्वरित भाग फेकून दिला जातो.
आपल्याला खाण्यायोग्य नसलेले अन्न फेकून न देता गाईला किंवा इतर जनावरांना खाऊ घातले तर एका गाईचा वर्षाकाठी कमीत कमी २ हजार ५०० ते ५ हजारापर्यंत खर्च वाचू शकतो. असा प्रयोग करून काही शेतकऱ्यांना एका गाईच्या खर्चात वर्षाकाठी ९ हजारांची बचत केली आहे.
माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)