Dairy Success story :
नंदलाल पवार :
शेतीला जोडधंद्याची साथ मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होत आहे. अशीच यशोगाथा आहे वाशिम जिल्ह्यातील पिंप्री बु. येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची. शंकर बळीराम ठाकरे असे त्यांचे नाव.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाची कास त्यांनी धरली. आज त्यांनी २४ म्हशींच्या पालनपोषणातून दुग्धव्यवसायात प्रगत साधली आहे. शेतकरी शंकर बळीराम ठाकरे यांनी शहापूर परिसरात शेतीसोबतच दुग्धव्यवसाय सुरू केला आहे.
यासाठी त्यांनी १२ म्हशी महाराष्ट्राच्या, तर १२ म्हशी या गुजरात राज्यातून आणल्या. त्यांनी म्हशींसाठी गोठा उभारला असून, या गोठ्यामध्ये २४ म्हशी आहेत.
उन्हापासून बचाव
उन्हाळ्यामध्ये त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्याचे शेड बांधण्यात आले आहे. त्यामध्ये कूलर व पंख्यांची सोय करण्यात आली आहे.
मजुर करतात कामाचे व्यवस्थापन
या म्हशींची काळजी दिवसभर घेता यावी, याकरिता त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती, तर परप्रांतीय असलेले प्रदीप यादव, निरंजन यादव हे दिवसभर त्या ठिकाणी कष्ट करतात.
त्यांची दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजेपासून सुरू होते. शेण काढण्यापासून कडबा कुट्टी करणे, चारा टाकणे, तसेच गोठ्याची व जनावरांची स्वच्छता करण्याला जास्त महत्त्व देण्यात येते.
म्हशींपासून तिसऱ्या दिवशी एक ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत तयार होत आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.