एप्रिल ते सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत बीड जिल्ह्यात लम्पीने ६१० गायी, बैल व वासरांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील मृत जनावरांच्या पशुपालकांना अनुदान वितरित करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. वास्तविक पाहता ते अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळालेच नसल्याचे समोर आले आहे. मग हे अनुदानाचे पैसे गेले कुठे? हा प्रश्न आहे.
लम्पीने दगावलेल्या बैलांसाठी २५, तर गायींसाठी ३० हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते. मात्र, हे अनुदान देखील अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची बाबउघडकीस आली आहे. लम्पीने जनावरे दगावून सहा महिने पूर्ण झाले तरीही पशुपालकांना दमडीही मिळालेली नाही. मागील वर्षभरापासून जनावरांसाठी काळ बनून आलेल्या लम्पीने आतापर्यंत (सरकारी आकडेवारीनुसार) २ हजार ५२६ जनावरांचा बळी घेतला आहे. एप्रिलपासून ६१० जनावरांचा मृत्यू झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात रुपयाचे अनुदान वर्ग केलेले नाही.दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून अनुदान देण्याची मागणी होत आहे.
काय म्हणतात पशुपालक....
आमच्या गावात चार तेbपाच जनावरांचा लम्पीने बळी गेला आहे. काही महिन्यांपूर्वी गायीचा लम्पीने मृत्यू झाला, अद्याप अनुदानाचे पैसे आलेले नाहीत. शासनस्तरावरील सर्व कागदोपत्री कामे पूर्ण केली आहेत. - गहिनीनाथ गर्जे, खिळद, बीड
जानेवारीत लम्पी आजाराने ४० हजार रुपयांचा बैल दगावला आहे. पंचनामा झाला. मात्र, अद्याप अनुदान मिळालेले नाही. शासनाच्या मान्यतेने ३१ मार्चच्या अगोदर सर्व पशुपालकांना अनुदान देण्यात आले आहे. जानेवारीपासून पाठपुरवठा करतोय; परंतु अनुदान मिळाले नाही. - दिनकर शेलार, पशुपालक, शेलारवाडी, बीड
जिल्ह्यासाठी १३ लाख ४४ हजार रुपयांचा टप्पा मंजुर झाला आहे. लम्पीने जनावरे बळी गेलेल्या पशुपालकांना टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्यात येतील. शासनाकडून पैशाचा पुरवठा झाल्यानंतर तत्काळ अनुदान वितरित होत आहे. - वि. भा. देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, बीड