सोलापूर : गायदूध खरेदीचा २७-२८ रुपयांवर घसरलेला दर सावरत सर्वत्र ३० रुपये इतका झाला असताना 'सोनाई' ने १६ जानेवारीपासून एक रुपयांची आणखीन वाढ करीत ३१ रुपयांवर नेला आहे.
जागतिक बाजारात बटर पावडरचा दर वरचेवर सावरत असल्याने दूध खरेदी दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. मागील अनेक वर्षाप्रमाणे मागील वर्ष ही दूध उत्पादकांसाठी फार मोठे संकटाचे वर्ष होते.
कोरोनात सलग दोन-तीन वर्षे दूध संघांनी (१७-१८ रुपये लिटर) देईल तो दर शेतकऱ्यांनी घेतला. शेती व दूध व्यवसाय परवडत नसला तरी तो सोडता येत नसल्याने तो करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
कोरोनानंतर दूध खरेदी दर वाढतील असे वाटत असताना मागील वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी दरात दूध संघांनी घसरण केली होती.
शासनाने दूध संघासाठी नरमाईचे धोरण घेत दुधावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. कधी अनुदान तर कधी अनुदानाशिवाय शेतकऱ्यांनी संघांना दूध पुरवठा केला होता.
ऐन विधानसभा निवडणुकीत प्रतिलिटर पाच रुपये व नोव्हेंबर महिन्यात दोन रुपयांची वाढ करीत सात रुपये अनुदान राज्य शासनाकडून जाहीर केले होते. अनुदान बंद करताच दूध खरेदी दर २८ रुपयांवर आला होता.
राज्यात सर्वाधिक संकलन क्षमतेच्या सोनाई दूध संघाने २१ डिसेंबरपासून दोन रुपयांची वाढ करीत ३० रुपये केला होता. 'सोनाई' पाठोपाठ राज्यभरात जवळपास सर्वच दूध संघांनी गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये केला होता.
पावडर आणि बटरच्या दरामध्ये झाली वाढ
पावडरचे दर २१० रुपयांवर खाली आले होते दरात सुधारणा होत २४० ते २५० रुपये तर बटरचे ३७० रुपयांवर आलेले दर ४३० रुपयांपर्यंत वाढले आहेत. पावडर व बटरच्या दरात चांगली सुधारणा झाली असल्याचे सांगण्यात आले.
गाय दूध खरेदी दर ३१ रुपये केला आहे हे त्यात आणखीन वाढच होईल. आता ३० रुपयांपेक्षा कमी दर होईल असे वाटत नाही. फेब्रुवारीमध्ये खरेदी दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात दूध बटर व पावडरच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. त्याचे परिणाम दूध उत्पादकांसाठी सकारात्मक दिसत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर
अधिक वाचा: तुम्हालाही पशुप्रदर्शनात मारायची असेल बाजी; पशुपालकांनो अशी करा तयारी