आयुब मुल्ला
खोची : उसापेक्षा शाळूचे यंदा चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी खूश आहे. त्यातच हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागल्याने वैरणीसाठी कडबा या सुक्या चाऱ्याला मागणी वाढली आहे.
शेकडा २ हजार ५०० ते ३००० रुपयांपर्यंत दर गेला आहे. शाळूचे उत्पादन चांगले निघण्याबरोबरच कडबासुद्धा अधिकचा भाव मिळवून देऊ लागला आहे. आडसाली लावणीचे क्षेत्र कमी झाल्याने चारा टंचाई असल्याचे दिसून येत आहे.
हातकणंगले तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. पशुधन संख्याही चांगली आहे. दुधाचे उत्पादनही तुलनेने अधिक आहे. नैसर्गिक रचनाही मुबलक चारा उपलब्धता असणारी आहे.
परंतु, मान्सूनने दमदार हजेरी लावली होती. पावसाचे जास्त प्रमाण झाल्याने ऊस पिकावर परिणाम झाला. वाढ कमी झाल्याने उत्पादनही घटले. त्यातच यंत्राने तोडणीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वाडे मिळणे कमी झाले.
जेवढं काही वाडे मिळत होते, त्यासाठी धावाधाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातच किमान एक महिना अगोदर कारखान्याचे हंगाम संपले. त्यामुळे वैरणीचा प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली.
जुलैमध्ये आडसाली लावण केलेले क्षेत्र गतवर्षीपेक्षा तालुक्यात एक हजार हेक्टरने घटले आहे. या उसाचा पाला वैरणीसाठी शेतकरी शोधू लागले आहेत.
अनेक ठिकाणी ज्या शेतकऱ्याचा ऊस दमदार आला आहे, त्या ठिकाणी उसाचा पाला काढू नये, अशा सूचना करणारे फलक लावले आहेत. यामुळेच वैरण टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शाळूच्या कडब्याचा भाव चांगलाच वधारला आहे. तालुक्यात ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात शाळू करण्यात आला. निसर्गाची चांगली साथ मिळाल्याने सुरुवातीपासून शाळूची उगवण व वाढ चांगली झाली.
वातावरणाचा योग्य परिणाम या पिकावर झाल्याने उत्पादनही चांगले निघाले आहे. एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
दरम्यान, पशुपालक ओल्या चाऱ्याबाबत उसावरच जास्त अंवलबून आहेत. हत्तीघास, कडवाळ वैरणीसाठी करणे गरजेचे आहे.
वैरणीसाठी मका
तालुक्यात मका पिकाचेही क्षेत्र वाढले आहे. वैरणीसाठी केलेले क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत आहे. शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळाल्याने त्याचा वापर वाढला आहे. मक्याची वैरण उन्हाळ्यात सहायक ठरू लागली आहे.
अधिक वाचा: प्रत्येक गोठ्यात पशुप्रथमोपचार पेटी का असावी? व त्यात काय असावे? वाचा सविस्तर