रविंद्र शिऊरकर
राज्यातील सर्व सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना दुधासाठी प्रतीलिटर ५ रुपये अनुदान शासनाकडून ०५ जाने पासून सुरू आहे. ज्यात सुरूवातीला हे अनुदान एक महिन्याकरिता होते मात्र नंतर २६ फेब्रुवारीला यात मुदत वाढ देऊन १० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
यातील अनेकांना मात्र अध्याप हे अनुदान प्राप्त झालेले नाही. ज्यामुळे अनेक शेतकर्यांत याबबात उलट सुलट चर्चा होती. यासाठी शासनाने नुकतीच सोमवार (दि. ११) रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली त्यातील निर्णयानुसार नवीन आदेश जाहीर केला आहे. ज्यानुसार हे रखडलेले अनुदान प्राप्त करण्यासाठी जमा करावयाच्या प्रस्तावास मुदतवाढ देण्यात आली आहे.
या अनुदान योजनेत सहभागी झालेल्या काही प्रकल्प धारकांकडे मोठया प्रमाणात दुध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या असल्याने शासनाने दि.११.०१.२०२४ ते दि.२०.०१.२०२४ या पहिल्या दसवडयासाठी तिसरी व चौथी फाईल अपलोड करण्यास मुदतवाढीसह परवानगी दिली आहे.
पतीला व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप
२२ - २०२३ आर्थिक वर्ष संपत आल्याने उपलब्ध अनुदान दि.३१/०३/२०२४ नंतर वितरीत करण्यास येणाऱ्या अडचाणी लक्षात घेता दि.११.०१.२०२४ ते दि.२०.०१.२०२४ या प्रथम दसवडयाची अनुदान अदायगीसाठीची फाईल दि.१६.०३.२०२४ पर्यंत स्विकारण्यात येईल. तसेच या योजनेची उर्वरित दसवड्याच्या (दि.२१.०२.२०२४ ते दि.१०.०३.२०२४) या कालावधीतील अनुदान अदायगीसाठीची फाईल दि.२५.०३.२०२४ पर्यंतच स्विकारण्यात येईल अशी सूचना दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
तसेच तदनंतर कोणतीही अनुदान अदायगीची फाईल विचारात घेतल्या जाणार नाहीत असाही स्पष्ट उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे. व हि बाब आपल्या कार्यक्षेत्रातील या अनुदान योजनेत सहभागी झालेल्या सर्व प्रकल्पांना अवगत करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे.
यामुळे आता रखडलेले हे अनुदान लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र असे न झाल्यास हि सर्वस्वी जबाबदारी संबंधीत संकलन केंद्र प्रकल्पांची राहील असे ही या आदेशात जाहीर करण्यात आले आहे.