पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत ६० लाखांचे वैरण बियाण्यांचे वाटप केले आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारीपासून पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. अशा वेळी शासनाकडून मिळणारे मोफत वैरण बियाणे घेऊन स्वतःचा चारा तयार करण्याची तयारी केली पाहिजे.
यंदा कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या ५५ टक्केच पाऊस झाला आहे. जमिनीतच पाणी नसल्याने फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात होईल. तसे संकेतही पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. अशा काळात पिण्यासाठी पाण्याला प्राधान्य राहणार आहे. अशा काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
अधिक वाचा: चारा पिकांची लागवड करा आणि पैसे कमवा
जिल्ह्यात साखर हंगाम अद्याप सुरू झालेला नाही, उसाची उपलब्धता पाहता कारखान्यांचा हंगाम जेमतेम १०० ते १२५ दिवस सुरू राहील. फेब्रुवारीपर्यंत उसाचे वाढे जनावरांसाठी उपलब्ध होतील, त्यानंतर ओल्या वैरणीची टंचाई भासू लागणार आहे. दुभत्या जनावरांना रोज ओली वैरण देणे गरजेचे असते. अन्यथा दूध उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या वैरणीच्या दृष्टीने नियोजन केले पाहिजे. जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्याचा पुरवठा केला जातो.
मक्याचा प्लॉट दोन हजार रुपये गुंठा? साखर कारखान्यांचा हंगाम संपला की वैरणीची टंचाई भासते. गेल्यावर्षी मक्याचा प्लॉट एक हजार रुपये गुंठा होता. यंदा त्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यात मिळणार बियाणेजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावपातळीवरील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बियाण्याचे वाटप केले जाते. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वाटप करायचे आहे.