म्हैस हा काटक प्राणी आहे. दुग्धव्यवसायामध्ये दुधाळ गायींबरोबरच दुभत्या म्हशींचाही मोलाचा वाटा आहे. म्हशींचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन योग्य ठेवले तर त्या कमी आजारी पडतात.
- म्हशींचे दुधदोहण शांत वातावरणात करावे. कर्कश मोठा आवाज उदा. फटाक्यांचा आवाज, लाऊडस्पिकरचा आवाज याने म्हशी बिचकू शकतात. त्यांचे रवंथ कमी होते. दुधाचे प्रमाण कमी होते. यामुळे शांततेत दुध दोहन करावे.
- म्हशींवर उष्ण वातावरणात गार पाणी मारावे. थंडीत त्यांच्या अंगावर उबदार गोणे टाकावे. म्हशींना पाण्याचा फवारा, तुषार यापेक्षा डुंबण्यासाठी डोह अगर वेगळा हौद असेल तर उत्तम.
- सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असे डुंबावयास सोडावे, ताज्या व्यालेल्या म्हशी व्याल्यानंतर सात-आठ दिवस डुंबावयास सोडू नयेत. त्यांना गोठ्यातच गार पाणी मारावे.
- म्हशींना नियमित वेळेवर ताजे, स्वच्छ पाणी पाजावे. प्रत्येक म्हशीला बसण्यासाठी आडवे रेलण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. तशी जागा नसेल तर उठतांना एकमेकांच्या सडावर पाय पडून सडांना इजा होऊ शकते.
- म्हशींच्या गोठ्यातील जमीन निसरडी नसावी. नाहीतर म्हशी घसरुन त्यांचे पाय मोडू शकतात. अशा निसरड्या जमिनीवरून उठताना मागच्या पायाच्या खुरांचा फटका सडावर-कासेवर बसतो व कासेला/सडांना इजा होते.
अधिक वाचा: कमी खर्चातील पशुखाद्य अझोला कसा तयार कराल?
- म्हशींना बादलीने पाणी पाजत असताना किमान दिवसातून तिनदा पाणी पाजावे.
- म्हशी या सवयीच्या गुलाम आहेत. तेव्हा रोजचे खाद्य घटक यांत अचानक बदल करू नये. व्यवस्थापनात मोठा बदल करू नये. तिला जेवढे प्रेम द्याल तेवढी ती व्यवस्थित रूळेल व चांगले दूध देईल.
- दूध काढण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित पान्हवायास हवे. या बाबत जी सवय त्यांना लावू त्यावर तिचे पान्हवणे अवलंबून आहे.
- पाठीवर थाप मारणे, शिळ वाजवणे, भिजवलेले आंबोण समोर ठेवणे, कास कोमट पाण्याने धुणे इ. सवयी असु शकतात.
- दूध काढताना आंबोण द्यावयाचे अथवा लगेच नंतर द्यावयाचे हे त्यांना जी सवय लावू त्यावर अवलंबून आहे. पण एकदा का त्यांनी पान्हा सोडला की लगेच दूध काढावयास हवे.
- म्हशींना उष्णता अजिबात सहन होत नाही. वातावरणातील तापमानात होणारा बदल पचविण्यासाठी श्वासोच्छास आणि शरीर तापमान यांची सांगड घालण्यासाठी म्हशींना अधिक काळ लागतो.
- गोठ्याच्या सभोवताली सावली असणारी उंच झाडे लावल्यास गोठ्यातील तापमान थंड राखण्यास मदत होते.
- म्हशींचा गोठा व त्यातील तापमान थंड करण्यासाठी गोठ्याच्या छतावर तापमान रोधक बाबी पसरणे आवश्यक असते.
संशोधन प्रकल्प,पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा