कुठलाही पशुपालन विषयक व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो. पण या चुका न कळल्यामुळे आपणाला गोठा बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. आपण आपल्याकडील जवळपास ८० ते ९० % शेतकऱ्याकडे पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाहीत. आपल्या चुकांचे खापर त्या व्यवसायावर फोडतो व हा धंदा फायद्याचा नाही म्हणून आपण तो बंद करतो. जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे या नोंदवहीचे महत्व आहे व दुग्ध व्यवसायात खालीलप्रमाणे काही महत्त्वाच्या नोंदी ठेवणे अतिशय आवश्यक आहे.
१) गाई-म्हशींच्या मुख्य नोंदीयामध्ये आपण प्रक्षेत्राचे / फार्मचे नाव, एकूण शेळ्यांची संख्या, मालकाचे नाव, संपूर्ण पत्ता, फार्म सुरु केल्याची तारीख, प्रजात, जात, शेळी पालनाचा उद्देश, फार्मची एकूण जमीनधारणा, नोंदीचे वर्ष इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक वृष्टीकोनातून उपयोगः या नोंदी ठेवल्यामुळे आपल्याला प्रक्षेत्राबद्दलची प्रस्तावना व मूळ उद्देश एका नजरेत कळतो२) वैयक्तिक गाई-म्हशीचा तपशिलःयामध्ये आपल्याला प्रत्येक गायीची/म्हशीची जन्मतारीख, विकत घेतलेली तारीख, कळपापासून किती दिवस वेगळी ठेवली, शेडमध्ये एकत्र सोडल्याची तारीख, लिंग, जात, वडिलांची ओळख, नोंदणी क्रमांक / नाव, आईचा ओळख नोंदणी क्रमांक / नाव, पाळण्याचा उद्देश, जन्मताचे वजन, विमा नोंदणी नंबर, वयात येण्याचे वय, पहिल्यांदा गाम घालविल्याची तारीख, मृत्युची तारीख कळपातून काढून टाकण्याची तारीख व कारण इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः आपल्याला एका गायीची किंवा ३ -४ गावीबद्दलची वरील गोष्टीबद्दलची माहिती वर्षानुवर्षे लक्षात ठेवणे कठीण जाते व मग उत्पादन वाढीसाठी आवश्यक निर्णय घेता येत नाहीत. जर या गोष्टींच्या नोंदी ठेवल्या तर आपणाला जनावरांची अनुवंशिकता, वजन, शारीरिक वाढ, उत्पादन वाढ व गायींच्या/म्हशीच्या समस्यांबद्दल योग्य ती कार्यवाही करता येते व आपणाला आपल्या फार्मवर एकूण किती जनावरे आहेत व त्यामधे नर माद्या यांची योग्य माहिती समजते.३) प्रजननाविषयी नोंदीचा तपशील:यामध्ये आपल्याला प्रत्येक गायीचा/म्हशीचा वेत क्रमांक, मागची विण्याची तारीख, माज केलेल्याची तारीख, वळू दाखविला/कृत्रिम रेतन, वळूची जात व टक्केवारी, बळूचा नोंदणी क्रमांक, कृत्रिम रेतन करणाऱ्या व्यक्तीचा तपशील, गर्भधारणा निदान तारीख, गर्भधारणा निदान व परिणाम तारीख, विलेल्याची तारीख, विल्यानंतरच्या पहिल्या माजाची तारीख, विल्यानंतरच्या ज्या माजाला गाम राहिली त्या माजाची तारीख, एका गर्भधारणेसाठी किती वेळा कृत्रिम रेतन / बळू दाखविला इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक वृष्टीकोणातून उपयोगः यामधून आपणाला गायीमधील/म्हशीमधील प्रजजन विषयक अडथळे जसे कि गाय किती दिवस गाभण राहत नाही, एकदा गाभण रहायला किती माज लागतात, एका गर्भधारणेसाठी किती वेळा कृत्रिम रेतन करावे लागते, कोणता नर/वळू चांगला आहे व इ. गोष्टी, त्यामध्ये असणाऱ्या अडचणी व त्यावर कोणत्या आवश्यक उपचारांची गरज आहे याबद्दल निर्णय घेता येतात.४) विण्याच्या नोंदीचा तपशील:यामध्ये आपण वेत क्रमांक, वळूचा ओळख नोंदणी क्रमांक, वळू दाखविला/कृत्रिम रेतनाची तारीख, अपेक्षित विण्याची तारीख,वास्तविक विल्याची तारीख, गर्भावस्थेचा काळ, वासराचा ओळख नोंदणी क्रमांक, जन्मलेल्या वासराचे लिंग, विण्यामध्ये काही अडथळा आला होता का व असल्यास कोणता इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः यामधून आपणाला गायीमधील/म्हशीमधील दोन वेतामधील अंतर जास्त होत असेल तर ते कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतात, कुठला वळू चांगला आहे, गाई-म्हशी कितीवेळा वितात, एखादी गाय पुन्हा पुन्हा गाभडते का इ. गोष्टीबद्दल माहिती मिळते व याबद्दल आवश्यक निर्णय घेता येतात.५) दररोजच्या दुग्धउत्पादनाच्या नोंदीचा तपशीलःयामध्ये आपण प्रत्येक गायीपासून/म्हशीपासून सकाळचे दूध, संध्याकाळचे दूध, डेअरीला घातलेले एकूण दूध, एकूण फॅट %, एकूण एस.एन.एफ. %, मिळालेला भाव, एकूण मिळालेली रक्कम, महिन्याची दुधाची सरासरी, महिन्याची फॅटची सरासरी, महिन्याची एस.एन.फ. सरासरी इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः आपल्याला यापासून गायीच्या/म्हशीच्या दुग्धोउत्पादनाच्या व त्यापासून मिळणाऱ्या गोष्टींचा तपशील मिळतो व आहे त्या संख्येत वाढीव दुग्धोत्पादनासाठी आवश्यक निर्णय घेता येतात.६) उपचाराविषयीच्या नोंदी:यामध्ये आपण उपचार विषयक नोंदी जसे कि दिनांक, लक्षणे, औषधाचे नाव, औषधाचा प्रकार, डॉक्टरचे नाव व उपचारावरील खर्च इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः आपल्याला यापासून गाय/म्हैस किती वेळा आजारी पडते, काय लक्षणे असतात व उपचारावर खर्च किती होतो मग गायीचे/म्हशीचे आरोग्य कसे आहे व ती फायदेशीर आहे का हे कळते व तिला गोठ्यावरून काढून टाकण्याबद्दलचे निर्णय घेता येतात.७) लसीकरण विषयक नोंदी:यामध्ये आपल्याला गायीला/म्हशीला दिलेल्या लसीचे नाव, लसीच्या रोगाचे नाव, लसीचा दिनांक, बॅच नंबर, देण्याचा मार्ग, डोस, अंतिम वापराची तारीख, पुढच्या डोसची तारीख, लसीची किंमत, लस कोणी दिली, लसीचे नाव इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः विविध रोगांवरील लसी कोणत्या व त्यांच्या तारखा व पुढचा डोस कधी द्यायचा आहे व लसीकरणावर किती खर्च होतो अशा महत्त्वाच्या गोष्टी समजतात.८) जंतनिर्मुलन विषयक नोंदी:यामध्ये आपल्याला गायीला/म्हशीला दिलेली जंतनाशके, बाह्यकृमी/अंतकृमी, जंतनाशकाच्या रोगाचे नाव, जंतनाशकाचा वापराचा दिनांक, बॅच नंबर, देण्याचा मार्ग, डोस, जंतनाशक देण्याची पुढची तारीख, वापराची अंतिम तारीख, जंतनाशकाची किंमत, जंतनाशक कोणी दिली इ. नोंदी ठेवतोव्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः गायीला/म्हशीला कुठली जंतनाशके कधी दिली व त्यांचा उपयोग कसा झाला हे कळते तसेच कुठले जंतनाशक दिल्यावर बाह्यकृमी/अंतकृमी यांचा प्रभाव कमी होतो व जंतनिर्मुलनावर किती खर्च होतो हे कळते...९) रोगांच्या चाचण्याविषयीच्या नोंदी:यामध्ये आपण विशिष्ठ रोगांच्या चाचण्या करतो व काही नोंदी ठेवतो जसे कि दिनांक, रोगाचे नाव, चाचणीचे नाव, प्रयोगशाळेचे नाव, अंतिम निरीक्षण, डॉक्टरचे नाव, चाचणीचा निकाल, केलेला उपाय इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः एखाद्या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली व काय निदान झाले व काय उपचार केले किती खर्च आला हे समजते.१०) वजन विषयक नोंदी:यामध्ये आपण गायींची / म्हशीची जन्मतारीख, जन्मताचे वजन, वजनाचा दिनांक, वजनामधील वाढ, इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः यामुळे आपणाला जनावरांची वाढ वयानुसार व्यवस्थित होत आहे कि नाही हे कळते.११) गायींची/म्हशीची महिन्याची शारीरिक स्थिती:या मध्ये आपण प्रत्येक गायीची/म्हशीची दर वर्षातील, दर महिन्याची शारीरिक स्थिती जसे कि गाय किती महिन्याची गाभण, भाकड व किती महिन्याची गाभण, किती महिन्याची दुभती, भाकड, दुभती पण किती महिन्याची गाभण, ६ महिन्यापर्यंतचे वासरू, ६ ते २४ महिन्याचे वासरू/गाय, पहिल्यांदा गाभण, इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः यामुळे आपणाला गाय/म्हैस कुठल्या महिन्यात कोणत्या शारीरिक स्थितीत आहे हे समजते व त्यामुळे व्यवस्थापन व कोणती पोषण मुल्ये कधी द्यायला पाहिजेत हे समजते.१२. पोषण विषयीच्या नोंदी:या मध्ये आपण प्रत्येक गायीला/म्हशीला दर वर्षातील दर महिन्याची शारीरिक स्थितीनुसार किती ओला चारा (किलो), वाळलेला चारा (किलो), खुराक (किलो), खनिजमिश्रण (ग्राम) देत आहोत याचा लेखाझोका इ. नोंदी ठेवतोव्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः दुग्धव्यवसायामध्ये चारा या एका गोष्टीवर जवळपास ६५ ते ७० % खर्च येतो व तो आपला बराच वाया जातो या मुळे आपणाला ओला व वाळला चारा व्यवस्थापन, महिन्याला किती चाऱ्याची गरज आहे, खुराक व खनिजमिश्रण महिन्याला किती लागते हे कळते तसेच चाऱ्यासाठी किती खर्च होतो आहे हे कळते.१३) गायीच्या/म्हशीच्या जमा खर्च विषयीच्या नोंदी :यामध्ये आपण तारीख, खर्चाची बाब, खर्चाचे कारण, एकूण रक्कम, रक्कम कुणाला दिली, तारीख, मिळकतीची बाब, कशापासून मिळकत झाली, एकूण रक्कम, रक्कम कुणाकडून मिळाली, इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः यामुळे आपणाला जमा व खर्च याचा दर महिन्याचा लेखाजोखा कळतो व जमा झालेला पैसा व खर्च झालेला पैसा याच्या नोंदी ठेवल्यामुळे या धंद्यामध्ये फायदा कि तोटा होत आहे हे समजते.१४) कामगार विषयीच्या नोंदी:यामध्ये आपण कामगाराचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, कामावर रुजू झाल्याची तारीख, दर, दिवसाचा पगार, पगाराची रक्कम, पगाराची तारीख, काम सोडल्याची तारीख, अतिरिक्त पैशाची रक्कम व तारीख इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोनातून उपयोगः यामुळे आपणाला कामगाराविषयी सर्व नोंदी कळतात व सध्याच्या कामगारामुळे फार्म वर सुधारणा झाल्या आहेत कि नाहीत ते कळते व कोणता कामगार सगळ्यात उत्तम आहे हे समजते व त्यांच्यावर आपण किती पैसे खर्च केले हे कळते.१५) कामगाराचे हजेरीपत्रकःयामध्ये आपण फार्म वरील सर्व कामगारांच्या नोंदी जसे कि कामगाराची दर महिन्याची दर दिवसाची हजेरी याबाबतच्या नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः यामुळे आपणाला कामगाराची दर महिन्याची हजेरी कळते व त्यांचा पगार करण्यास सोयीस्कर होते तसेच त्यादिवशी आपण पर्यायी व्यवस्था काय केली व फार्म वर काही गैरसोय झाली का हे कळते.१६) विमा तपशीलःयामध्ये आपण गायींच्या/म्हशीच्या विम्याबद्दलच्या जसे कि ओळख नोंदणी क्रमांक, टॅग क्रमांक, विमा पॉलिसी, विमा पॉलिसी काळ, पैसे भरल्याची तारीख, विमा रक्कम, कंपनीचे नाव आणि संपर्क तपशील, एजंट नाव आणि संपर्क तपशील इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक वृष्टीकोणातून उपयोगः यामुळे आपणाला विम्याच्या संदर्भात सर्व गोष्टी कळतात जसे कि विमा कुठल्या कंपनीचा केला, कधी केला, विमा पॉलिसी काळ, कधी संपते आहे व किती पैश्याचा प्रिमीयम आहे व कुठलिही गैरसोय झाली तर आवश्यक निर्णय घेता येतात.१७) प्रक्षेत्रावरील स्थायी सामान विषयक नोंदी:यामध्ये आपण फार्म वरील सर्व सामानाच्या नोंदी जसे कि सामानाचे नाव व नंबर, सामानाचे वर्णन व कंपनी, खरेदीची तारीख व बिलाचा नंबर, खरेदी किंमत व सध्याची किंमत, विक्रेत्याचे नाव व पत्ता व मोबाईल, विल्हेवाट लावल्याची तारीख व नंबर, वापरासाठी किती व कधी दिली, वस्तू किती तारखेला चेक केल्या, वस्तू चेक केल्यानंतरचा अहवाल, शिल्लक, अंदाजे किंमत, शेरा इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः यामुळे आपणाला आपल्या फार्म वर कोणते समान घेतले, कधी घेतले, कुठल्या कंपनीचे घेतले, खरेदी किंमत, सध्याची किंमत त्या सामानाची सद्यस्थिती या अतिशय महत्वाच्या गोष्टी समजतात.१८) गायीची/म्हशीची एकूण उत्पादन कामगिरी नोंदी:यामध्ये आपण गायींच्या सर्व उत्पादन, पुनरुत्पादन, वाढीविषयक इ. जसे कि गायीचे/म्हशीचे उत्पादक जीवन, जीवनात एकूण वेत, सरासरी विल्यानंतर गाभ जाण्यासाठी लागणारे दिवस, सरासरी दूध न देण्याचा कालावधी, सरासरी दोन वेतांमधील अंतर, पहिल्या वेताचे वय, गर्भावस्था कालावधी, प्रत्येक गर्भधारणेसाठी लागणारी कृत्रिम रेतने/बैल दाखविला, सरासरी विल्यानंतर माजावर येण्यासाठी लागणारे दिवस, सरासरी दूध उत्पादन. जीवन वेळ दूध उत्पन्न, सरासरी फॅट टक्केवारी, सरासरी एस. एन. एफ. टक्केवारी, वर्षातून किती वेळा आजारी पडते, वयात आल्यानंतर वय, माज किती दिवसाला करते, माजाचा कालावधी, प्रथम गाभ घालावितानाचे वय, परिपक्वतेच्या वेळी वय, दूध उत्पादनाचा कालावधी, कृत्रिम रेतने/बैल दाखविल्यावर गर्भधारणा तपासणी, पैदास कार्यक्षमता इ. नोंदी ठेवतो.व्यावसायिक दृष्टीकोणातून उपयोगः या नोंदी ठेवल्यामुळे आपली गाय/म्हशीचे सर्व उत्पादन, पुनरुत्पादन, वाढीविषयक संदर्भ, नोंदीनुसार उत्पादन देत आहे का याचा सर्व अंदाज येतो व गाय विकताना आपणाला आपल्या गायीला जास्त किंमत मिळवता येते.
वरीलप्रमाणे सर्व नोंदी ठेवल्या तर जनावरांची संख्या न वाढवता उत्पादन वाढवता येऊ शकते. जर प्रत्येक गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर प्रत्येक जनावरांबद्दल वेळच्या वेळी योग्य निर्णय घेता येतात व व्यावसायिक दृष्टीकोणातून व्यवसायाची जडणघडण लक्षात घेता येते. नोंदवह्या ठेऊन आपण आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर करु शकतो.
डॉ. तेजस चंद्रकांत शेंडेपशुअनुवंश व पशुपैदास विभागक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ