Join us

बैलांना 'नाल' ठोकण्याचे काम करणाऱ्या या कुटुंबाबद्दल माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 3:43 PM

भंडारा जिल्हयात असलेल्या लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील बावणे कुटुंबीय बैलांच्या पायांची झीज व ईजा होऊ नये म्हणून बैलांच्या पायांना लोखंडी नाला मारण्याचे कार्य करीत असून, त्या कार्यातून त्यांच्या तब्बल दोन पिढ्यांना पारंपरिक रोजगार प्राप्त झालेला आहे.

सुभाष गरपडे, जेवनाळा

जेवनाळा (भंडारा) : कला मग ती कोणतीही असो, माणसाला ती जिवंत ठेवते. किंबहुना आयुष्यभर जगण्यास ती मदत करते. उच्च शिक्षण घेऊन आजच्या तरुणांनी विविध कार्यांशी निगडित सामाजिक गरजानुरूप कौशल्य प्राप्त करून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणांमध्येही यावर भर दिलेला आहे. लाखनी तालुक्यातील गोंडेगाव या गावातील बावणे कुटुंबीय बैलांच्या पायांची झीज व ईजा होऊ नये म्हणून बैलांच्या पायांना लोखंडी नाला मारण्याचे कार्य करीत असून, त्या कार्यातून त्यांच्या तब्बल दोन पिढ्यांना पारंपरिक रोजगार प्राप्त झालेला आहे.

लाखनी तालुक्यातील गोंडेगाव हे लहानशे गाव. या गावात राजेश कुसोबा बावणे हा तरुण राहतो. दहावीपर्यंतचे शिक्षण आणि जातीने लोहार आहे. त्यांचे वडील कुसोबा बावणे हे सुतारकाम करायचे, त्याचबरोबर वजनदार भार उचलताना बैलांचे पाय झिजू नये, त्यांना इजा होऊ नये म्हणून भार ओढणारे बैल तसेच पटाच्या शर्यतीच्या बैलांच्या पायांना लोखंडी नाल ठोकण्याचे कार्य करीत असत. त्यांचे अख्खे आयुष्य याच कामात गेले.

शेतकरी स्वतःच जोडी आणून बैलांच्या पायांना नाल मारून घेत असत. त्यातून त्यांना रोजगार प्राप्त झाला. वडिलांचे काम लहानपणापासूनच बघता बघता राजेशलासुद्धा बैलांच्या पायांना नाल ठोकण्याचे कौशल्य प्राप्त झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर राजेशने पुढचे शिक्षण न घेता वयाच्या सोळाव्या वर्षापासून बैलांना नाल ठोकण्याचा व्यवसाय सुरू केला.

या कामात जवळपास चार लोकांची गरज असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची या कामात मदत घेतली जाते. कितीही मोठा बैल असू द्या राजेश एकटाच त्या बैलाला खाली पाडून, त्याचे पाय बांधून त्याला नाल ठोकतो. एका जोडीला नाल मारण्याचे ५०० रुपये घेतो. त्यासाठी त्याला जवळपास २०० रुपये खर्च येतो. पूर्वी खेडे स्वयंपूर्ण होते. त्यात एक पिढी दुसऱ्या पिढीकडे व्यवसाय हस्तांतरित करीत असे. शालेय शिक्षणासोबतच पारंपरिक व व्यावहारिक व्यवसायाचे घरीच कौशल्य प्राप्त केले, तर रोजगार सहज मिळू शकतो हे राजेशने दाखवून दिले आहे.

घरीच केली जाते नाल तयारपूर्वी घरूनच हा व्यवसाय चालायचा. परंतु आता लाखनी, लाखांदूर, तसेच साकोली या तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये जाऊन राजेश बैलजोडी मालकांना घरपोच सेवा देत आहे. नाल बनविण्यासाठी लोखंडी पट्टी आणली जाते. त्यानंतर त्या लोखंडी पट्टीला घरीच भात्यावर गरम करून तोडून, वाकवून आणि छिद्र पाडून बैलांच्या पायांच्या आकाराची नाल तयार केली जाते. बैलांच्या पायांच्या खुरांना खिळे ठोकून नाल पक्की केली जाते.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेती क्षेत्र